आखाडा बाळापुर ( हिंगोली ) : नवीन बसस्थानकाजवळील बोल्डा रोडवर असलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आखाडा बाळापुर शाखा फोडण्याचा प्रयत्न मंगळवारी रात्री १०.४५ च्या सुमारास झाला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेने त्यांचा प्रयत्न असफल झाला. पोलिसांनी दोन्ही चोरांना रंगेहाथ पकडत ताब्यात घेतले.
बोल्डा रोडवर परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. मंगळवारी रात्री १०:४५ वाजण्याच्या सुमारास दोघेजण बँकेच्या शटरचे कुलूप तोडत असल्याचे शेजारच्यांना लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत कल्पना दिली. जमादार संजय मारके, संतोष नागरगोजे, पोना भालेराव हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना ताब्यात घेतले.
याप्रकरणी अविनाश रमेशराव सावंत यांच्या फिर्यादीवरून राजु सखाराम पारटकर, अनिल गौतम पंडित (दोघेही रा.रुद्रवाडी ) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.