अकोला : दहीहांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशी व विदेशी दारूची अवैध विक्री करू देणे तसेच जुगार व वरली अड्डे चालू करण्यासाठी दहीहांडाचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी परवानगी द्यावी, यासाठी त्यांना ५० हजार रुपयांच्या लाचेचे आमिष देऊन त्यापैकी २५ हजार रुपयांची लाच देत असताना ३ जुगार माफियांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी पहाटे ४ वाजता अटक केली. या कारवाईने दहीहांडा पोलीस ठाण्यात खळबळ उडाली. राज्यातील हा दुर्मिळ रिव्हर्स ट्रॅप असल्याची माहिती असून, अकोला जिल्ह्यातील दुसरा रिव्हर्स ट्रॅप असल्याचे समजते.दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे तसेच देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या होत असलेली विक्री बंद केली. त्यामुळे त्यांना लाच देण्याचे आमिष देऊन हे गोरखधंदे पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न काही जुगार माफियांनी केला होता; मात्र ठाणेदार अहिरे यांच्या तत्त्वांना हे पटणारे नसल्याने त्यांनी या माफियांना टाळले. तरीदेखील अहिरे यांच्यावर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे अहिरे यांनी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० आणि २१ मे रोजी पडताळणी केली असता शिवा गोपाळराव मगर (३०), अभिजित रविकांत पागृत (३१) व घनश्याम गजानन कडू हे तिघे ५० हजार रुपये लाच देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले. त्यानंतर २५ हजार रुपयांचा पहिला हप्ता घेऊन हे तिघे शनिवारी पहाटे दहीहांडा ठाण्यात पोहोचले. यावेळी सापळा रचून असलेल्या पथकाने तिघांना रंगेहाथ अटक केली.
अकोल्यात ठाणेदाराला लाच देण्याचा प्रयत्न, तीन जुगार माफिया गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 9:04 AM