महाड - एस.टी. आगारात आज सकाळी एका कर्मचाऱ्याने आगार परिसरातील झाडाला गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. हि घटना सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्याला तातडीने सोडवून त्याचा जीव वाचवला आहे. याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात एस.टी.विभागाकडून घटनेची माहिती देण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र स्टेट परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे एस.टी.च्या सर्व फेऱ्या बंद आहेत. एस.टी.कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना देखील विविध भागात घडल्याच्या घटना सुरु असतानाच शनिवारी सकाळी ०८ वाजता एस.टी.चालक संदीप तावरे वय ३५ याने आगाराच्या छपरावर चढून आगाराच्या भिंतीला लगत असलेल्या झाडाच्या फांदीला उपरणे बांधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
हि घटना शेजारील सुरक्षारक्षकाच्या लक्षात येताच त्याने धाव घेत त्याला या फासातून सोडवले. महाड आगाराचे प्रभारी प्रमुख शिवाजी जाधव यांनी पोलिसांना या घटनेची कल्पना दिली. त्यानुसार महाड शहर पोलीस ठाण्यात एस.टी.चालक संदीप तावरे याची चौकशी केली असता त्याने घरगुती वादातून हे पाउल उचलले असल्याचे सांगितले असल्याची माहिती प्रभारी आगारप्रमुख शिवाजी जाधव यांनी सांगितले.