जळगाव - रस्त्यावरील पालापोचाळा व कचरा टाकून मध्यरात्री ‘वसंत स्मृती’ हे भाजप कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी या प्रकरणी विजय श्रीराम पवार (४०, रा.बळीराम पेठ) याला अटक केली आहे. दरम्यान, विजय हा भाजपचाच कार्यकर्ता असून यापूर्वी त्याने भाजप बैठकीत माजी मंत्री गिरीश महाजन यांना शिवीगाळ तर मध्य प्रदेशच्या माजी मंत्र्यांच्या वाहनावर दगडफेक केली होती. पक्षाने मात्र तो भाजप कार्यकर्ता नसल्याचे स्पष्ट करुन मनोरुग्ण असल्याचे जाहिर केले होते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटेच दोन वाजेच्या सुमारास भाजप कार्यालयातील प्रवेश करतानाच उजव्या हाताचा लाकडी दरवाजा कचरा व पालापाचोळा टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. संपूर्ण दरवाजा जळून खाक झाला, तरी त्याचा कोणाला खबर नाही. काही जणांनी एका जणाला कार्यालय जाळताना पाहिल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी भाजपचे कार्यालयीन कामकाज पाहणारे प्रकाश भगवानदास पंडीत (५२, रा.विवेकानंद नगर) यांनी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द फिर्याद दिली. शनिवारी संध्याकाळी ७.३० वाजता कार्यालय बंद करुन घरी गेलो. रविवारी सकाळी ७.५७ वाजता कार्यालयात कामकाज करणारे गणेश माळी यांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी प्रकाश पंडीत यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पंडीत यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली असता लाकडी दरवाजा जळून खाक झालेला होता. आतील कागदपत्रे व इतर साहित्य मात्र सुरक्षित होते. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर प्रकाश पंडीत यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात कलम ४३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यात दरवाजाचे दोन हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
चौकशीअंती एकाला घेतले ताब्यातगुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाधिकारी उल्हास चऱ्हाटे यांनी चौकशी केली असता हा प्रकार विजय श्रीराम पवार यांनी केल्याचे उघड झाले. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन दुपारी अटकेची कारवाई केली. गेल्या महिन्यात ३१ ऑक्टोबर रोजी कोअर कमिटीची बैठक होती. त्यावेळी देखील विजय याने माजी मंत्री गिरीश महाजन यांना शिवीगाळ केली होती तर मध्य प्रदेशचे माजी मंत्री अशोक उईके यांच्या वाहनावर दगडफेक केली होती. तेव्हा या वाहनाच्या काच फुटल्या होत्या. त्यावेळी पोलिसात तक्रार देणे पक्षाने टाळले होते. विजय हा मनोरुग्ण आहे, व तो स्व.प्रमोद महाजन यांच्या फोटोनजीकच्या सोफ्यावर झोपून बिडी पीत असल्याच्या कारणावरुन महाजन यांनी त्याला हटकले होते, तेव्हा त्याने शिवीगाळ केली होती, असे खुद्द गिरीश महाजन यांनीच पत्रकारांना सांगितले होते.