संजय पाटील
कऱ्हाड - कऱ्हाड-विटा मार्गावरील गजानन हौसिंग सोसायटीत सोमवारी पहाटे चोरट्यांनी एटीएम केंद्र जिलेटिनच्या सहाय्याने उडवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला. पोलिसांनी चोरट्यांशी झटापट करीत त्यांना पकडले. मात्र, चोरट्यांनी त्यांच्याकडील स्प्रे पोलिसांच्या डोळ्यात मारल्याने तीन पोलीस जखमी झाले. याचा फायदा घेऊन तीन चोरटे पसार झाले. तर एकाला पकडून ठेवण्यात जखमी पोलिसांना यश आले.
सचिन अशोकराव वाघमोडे (वय ३८, रा. आदर्शनगर, काळेवाडी, पुणे) असे पोलिसांनी पकडलेल्या संशयित दरोडेखोराचे नाव आहे. याचठिकाणी मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. गजानन हौसिंग सोसायटीत काही लोक एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती वायरलेसद्वारे रविवारी रात्री पोलिसांना मिळाली. वायरेलस कक्षातील महिला पोलिसाने प्रसंगावधान राखत हा प्रकार पेट्रोलिंग करत असलेल्या दामिनी पथकासह बीट मार्शल पथकास कळवला. पोलीस हवालदार जयसिंग राजगे, हवालदार पाटील, हवालदार सुर्यवंशी, गृहरक्षक दलाचे निकम हे गजानन हौसिंग सोसायटीत पोहचले. त्यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करताच चोरट्यांनी पोलिसांशी झटापट सुरू केली.
पोलिसांनी धाडसाने चौघांना पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र यातील एका चोरट्याने त्याच्या हातातील स्प्रे पोलिसांच्या डोळ्यात मारला. त्यामुळे पोलीस जखमी झाले. तरीही पोलिसांनी चोरट्यांना पकडून ठेवले. मात्र पोलिसांच्या जखमी होण्याचा फायदा घेत तीन चोरटे पसार झाले. एटीएम सेंटरच्या बाहेर एक संशयास्पद वायर अंथरली असून जिलेटीनच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न तर नव्हता ना? याचा शोध घेण्यात येत आहे.