नाशिक- पुणे महामार्गावरील पळसे शिवारातील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी येथील वॉचमनच्या डोळ्यांत मिरची पूड फेकली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी वॉचमनच्या पत्नीने आरडाओरड केली असता चोरट्यांनी तेथून धूम ठोकली.
नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे बसस्थानक परिसरात एका गाळ्यात बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. गुरुवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी जवळच राहत असलेले व रात्रीच्या वेळी वॉचमन काम करणारे दिनकर कोंडाजी गायधनी (५७) यांनी त्या तिघा जणांना हटकले. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. तसेच त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी झालेल्या आवाजामुळे त्यांची पत्नही गाढ झोपेतून जागी झाली. पतीला तीघे बेदम मारहाण करत असल्याचे बघून तिने आरडाओरडा करत प्रतिकार केला. डोळ्यात मिरचीची पूड टाकूनसुद्धा वॉचमन व त्याच्या पत्नीने चोरट्यांना एटीएममध्ये प्रवेश करू दिला नाही. त्यांना तीव्र विरोध केल्याने चोरट्यांना तेथून पळ काढावा लागला.
आजुबाजूचे लोक गोळा होतील या भीतीपोटी चोरट्यांनी जाताना त्यांच्या दिशेने दगडफेक केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास सुरु केला. वॉचमन दिनकर गायधनी यांना उपचारकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या जबाबावरून अज्ञात मारेकरी चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.