दरभंगा - बिहारच्या दरभंगा येथील मोरो पोलीस ठाणे रविवारी रात्री काही समाजकंटकांनी पेटवून दिले. पोलीस ठाण्यातच पोलिसांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले. समाजकंटकांचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक दुचाकीही दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण बॉक्समधून काही ज्वलनशील पदार्थ फवारताना दिसत आहे. फवारणी करून आग लावण्याचा प्रयत्न होतोय याचीही चौकशी होत आहे.
घटनेची माहिती मिळताच शहर एसपी सागर कुमार यांनी घटनास्थळी पोहोचून संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. पोलीस ठाण्यात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एका अज्ञात युवकाचा चेहरा कैद झाला आहे. त्याची पडताळणी केली जात आहे. लवकरच संपूर्ण प्रकरण उघड होईल असं त्यांनी माध्यमांना सांगितले.
घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्री १२.२१ ते १२.५४ च्या दरम्यान एक तरुण पोलीस ठाण्याला आग लावताना दिसत आहे. त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही घटना रोखण्यासाठी ओडी ड्युटी आणि सेन्ट्री ड्युटी कर्मचार्यांच्या कारवायाही तपासल्या जात आहेत असं या प्रकरणाला दुजोरा देताना शहर एसपी सागर कुमार म्हणाले.
दरम्यान, पोलिसांनी या घटनेतील संशयित आरोपीला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली आहे. तर दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. अटक केलेला युवक खपरपुरा गावातील टनटन ठाकूरचा पुत्र धर्मेंद्र ठाकूर आहे. तर दुसरा फरार आरोपी सीताराम यादव यांचा पुत्र अरुण यादव आहे ज्याच्या अटकेसाठी पोलीस शोध घेत आहेत. तपासात धर्मेद्रने त्याचा गुन्हा कबुल केला. त्याने हे कृत्य का केले याचा पोलीस शोध घेत आहेत.