कल्याण: डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खूनाच्या गुन्हयातील आरोपीला बनावट कागदपत्रांच्या आधारावर जामीन मिळवून देण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका वकीलासह पाच जणांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी कल्याण जिल्हा न्यायालयाच्या परिसरातून सोमवारी रंगेहाथ अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये खूनाच्या गुन्हयातील आरोपीच्या वडिलांचाही समावेश आहे.
काही गंभीर गुन्हयातील अटक आरोपींना न्यायालयात बनावट जामीनदार म्हणून बनावट कागदपत्रे तयार करून जामीन करून देत असल्याबाबत व काही जामीनदार म्हणुन उपस्थित राहणार असल्याबाबतची माहीती गुप्त बातमीदारामार्फत पोलिस हवालदार मोहन खंडारे यांना मिळाली. त्यानुसार वरीष्ठ पोलिस निरिक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक भूषण दायमा, पोलिस उपनिरिक्षक मोहन कळमकर, नवनाथ कवडे, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक संजय माळी, एल के फालक, पोलिस हवालदार बापुराव जाधव, मोहन खंडारे, सचिन साळवी, किशोर पाटील, अनुप कामत, जगदीश कुलकर्णी, पोलिस नाईक महेश साबळे, पोलिस शिपाई विनोद चन्ने गोरक्ष शेकडे, गुरूनाथ जरग, मिथून राठोड, विजेंद्र नवसारे, राहुल ईशी आदिंच्या पथकाने सापळा लावून सोमवारी चौघांना कल्याण जिल्हा न्यायालयाच्या परिसरातून रंगेहाथ अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत संगनमत करून बनावट दस्ताऐवज (रेशनकार्ड) तयार करून खूनाच्या गुन्हयातील आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी बोगस जामीनदार न्यायालयात उभे करण्याच्या तयारीत संबंधित होते असे समोर आले. त्यांच्याकडे बनावट कागदपत्रे आढळुन आली. पोलिसांच्या तपासात आणखीन एका आरोपीला त्यानंतर अटक केली.
अटक केलेल्यांमध्ये वकील महमद रफीक अब्दुल सत्तार शेख, खूनाच्या प्रकरणातील आरोपीचे वडील महमद हबीब महमद रफीक हश्मी या दोघांसह जयपाल समाधानम जोगीरी, संतोष कन्हैयालाल मौर्या आणि चंदु उर्फ चंद्रकांत अर्जून खामकर या तिघांचा समावेश आहे. पाच जणांविरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व आरोपींना मंगळवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यात मोठे रॅकेट आहे का याचा तपास सुरू असल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक शिरसाठ यांनी दिली.