मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: मुंबईअहमदाबाद महामार्गावरील बाफाने ओव्हर ब्रीजच्या लगत असलेल्या नरेश मोटार गॅरेजच्या पाठीमागील मोकळ्या शेतातील नाल्याच्या दाट झाडाझुडुपामध्ये पंचवीस ते तीस वर्षीय अनोळखी व्यक्तीचा सडलेल्या स्वरूपातील मृतदेह २२ नोव्हेंबरला आढळुन आला. त्यावेळी अकस्मात मृत्यूची नोंद नायगांव पोलिसांनी केली होती. मृतदेहाचा सांगाडा पोलिसांनी जे जे रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवल्यावर त्याच्या डोक्यात दगड तसेच इतर कोणत्यातरी हत्याराने गंभीर दुखापत करून हत्या केल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिल्यावर नायगांव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार या घटनेत घडला आहे.
नायगांव पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटिकरण शाखा, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस या गुन्हयाचा समांतर तपास करीत आहेत. कोणीतरी अज्ञात आरोपीने खुन करून मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तो टाकण्याचा प्रकार केला आहे. मृतदेहाच्या शरीर सडलेल्या अवस्थेत सापडल्याने त्याची ओळख पटू शकलेली नाही. दरम्यान नायगांव आणि गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी मृतदेहाचे वर्णन जाहीर केले आहे. वर्णन जुळत असल्यास पोलिस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. मृतदेह पुरूष जातीचा असून वय अंदाजे २५ ते ३० वयोगटातील आहे. उंची अंदाजे ५ फूट, अंगात पिवळसर रंगाचा फुल बाह्याचा शर्ट, निळ्या रंगाची फुल जीन्स पॅन्ट, डोक्यावर लांब काळे केस, निळ्या रंगाची माचो कंपनीची अंडरवेअर, लाल निळ्या रंगाची चप्पल व पायामध्ये काळा धागा बांधलेला आहे. अशा वर्णनाची कोणत्याही पोलिस ठाण्यांमध्ये मिसिंग किंवा अपहरणाचा गुन्हा तसेच इतर तक्रार दाखल असल्यास त्वरीत नायगाव व गुन्हे शाखा युनिट दोनमधील पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांचे वेगवेगळे पथके मिसिंग बाबत माहिती घेत तपास करत आहे.