नागपूर - दारूड्या पित्याने पोटच्या चिमुकलची गळा घोटून हत्या करण्याचा प्रयत्न केला. वेळीच चिमुकलीचे आजोबा धावल्याने तिचा जीव वाचला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ही थरारक घटना घडली.
अतुल नरेंद्र अतकर (वय ४३) असे या नराधम पित्याचे नाव आहे. तो सिव्हील इंजिनिअर म्हणून नोकरीला होता. मात्र, दारूचे भारी व्यसन असल्याने तीन वर्षांपुर्वी त्याला नोकरीतून काढून टाकण्यात आले. तेव्हापासून तो वडिलांच्या निवृत्ती वेतनावर जगतो. त्याला पत्नी आणि दोन मुली आहेत. व्यसनानंतर तो हैवान होत असल्याने त्याची पत्नी सात वर्षीय मुलीला घेऊन माहेरी निघून गेली. तर, मोठी मुलगी चवी (वय १२) ही आजोबासोबतच राहते. नेहमीप्रमाणे आरोपी अतुल रविवारी रात्री १० च्या सुमारास दारूच्या नशेत टून्न होऊन घरी आला. प्रारंभी फोन करून त्याने सासऱ्याला शिवीगाळ केली. नंतर वडिलांशी वाद घालू लागला. त्यामुळे चवी तेथे आली. तिला पाहून त्याच्यातील हैवान जागा झाला. त्याने तिचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला.
ते पाहून चवीचे आजोबा आणि आरोपीचे वडिल नरेंद्र अतकर यांनी ताकदीनिशी चवीपासून आरोपीला दूर करण्याचे प्रयत्न केले. सोबतच मदतीसाठी आरडाओरडही केली. त्यामुळे शेजारी धावले. आरोपीच्या तावडीतून चवीला मुक्त करण्यात आले. मात्र, ती ओकारी करून बेशुद्ध पडली. त्यामुळे तिला गंभीर अवस्थेत खासगी ईस्पितळात दाखल करण्यात आले. नरेंद्र अतकर यांनी हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिली. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेत ठाणेदार सार्थक नेहते यांनी आरोपी अतुलविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलीस ठाण्यातही गोंधळआरोपींला अटक करून ठाण्यात नेल्यानंतर अतुलने पोलीस ठाण्यातही गोंधळ घातला. तो पोलिसांच्या नावाने शिमगा करू लागला. दारूच्या नशेत असल्याने पोलिसांनी त्याला रात्रभर कसेबसे हाताळून आज न्यायालयात हजर केले. नंतर त्याला कोठडीत पाठविण्यात आले.