ठाणे - नवरात्रोत्सव आणि गणेशोत्सवात जमा झालेल्या वर्गणीच्या वादातून गुंड शिवा ठाकूर याच्यासह त्याच्या अन्य पाच साथीदारांनी सुनील कोंडभर (३३, रा. नौपाडा, ठाणे) यांच्यावर तलवारीने वार करून खुनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी शिवासह सहा जणांना ठाणे न्यायालयाने सात वर्षे सक्षम कारावासासह सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.मल्हार सिनेमागृहाच्या गेटजवळ ८ जून २०१४ ला रात्री ११.३० च्या सुमारास हे थरारनाट्य घडले होते. शिवा आणि ज्यांच्या खुनाचा प्रयत्न झाला होता ते सुनील कोंडभर हे नौपाड्यातील दमाणी इस्टेट या एकाच परिसरात वास्तव्याला होते. कोंडभर हे हिंदू गर्जना मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्या वेळी मंडळाच्या सभासदांमध्ये वर्गणीवरून वाद निर्माण झाला होता.शिवाजी उर्फ शिवा कल्याण ठाकूर (३५, रा. ठाणे), त्याचे साथीदार भारद्वाज उर्फ बाळा लोंढे (३५, रा. गवाणपाडा, मुलुंड), प्रसन्न उर्फ बबलू हुमणे (२९, रा. प्रशांतनगर, डोंबिवली), प्रशांत खोपडे (२३, रा. पाचपाखाडी, ठाणे), गणेश पवार उर्फ गण्या (२४, रा. वर्तकनगर, ठाणे) आणि सागर जाधव (२३, रा. कशेळी, भिवंडी) यांनी गर्दी जमा करून या भांडणाचा राग मनात धरून शिवा आणि पवार यांनी तलवारीने सुनील यांच्यावर वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी नौपाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र पाठविल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले, पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर आणि हवालदार राजू निकुंभे यांनी न्यायालयात सबळ साक्षी-पुरावे सादर केले. त्याआधारे सरकारी वकील संजय लोंढे यांनी फिर्यादी काेंडभर आणि पोलिसांची भक्कमपणे बाजू मांडली.
खुनाचा प्रयत्न : सहा आरोपींना सात वर्षे कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2020 12:54 AM