मुंबई : उच्चशिक्षित तरुण... आलिशान घर आणि गाड्या... बघून कुटुंबीयांनी आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या मुलीचा मोठ्या थाटात विवाह करून दिला. तरुणीनेही सुखी संसाराचे स्वप्न रंगवत संसार थाटला. मात्र, लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून हाईप्रोफाईल सोसायटीआड दडलेल्या विकृतीचा तिला अनुभव यायला सुरुवात झाली. पतीकडून मूल होणे शक्य नसल्याचे कळताच घराला वंशाचा दिवा हवा म्हणून सासऱ्यानेच तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना माहीममध्ये घडली.
दोन महिने अत्याचार सहन केल्यानंतर तरुणीने हिमतीने पोलिसांत तक्रार दिली. मात्र, न्यायासाठी पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवण्याची वेळ तिच्यावर आली आहे. माहीममध्ये आई - वडिलांसोबत राहणारी २६ वर्षीय नेहा (नावात बदल) आयटी कंपनीत नोकरी करते. विवाह जुळविणाऱ्या गुजराती संकेतस्थळावर शोध घेत असताना २१ मार्च रोजी पवन शाह या तरूणाचे स्थळ आले. पवन हा उच्च शिक्षित, आलिशान घर, गाड्या पाहून मुलगी सुखात नांदेल, या विचाराने आई - वडिलांनी हे स्थळ पसंत केले. शाह कुटुंबीयांच्या आग्रहामुळे १४ मे रोजी वांद्रे येथील ताज हॉटेलमध्ये विवाह सोहळा झाला. नेहाने सुखी संसाराचे स्वप्न रंगवण्यास सुरुवात केली. मात्र, तिचे हे स्वप्न जास्त काळ टिकले नाही.
नेहाने दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सासऱ्याची मैत्रिण असलेल्या, एमआयडीसीमध्ये अधिकारी पदावर असलेली महिला आणि ६२ वर्षीय सासरा राजूच्या अश्लील बोलण्याने तिला धक्का बसला. त्यानंतर सासऱ्याकडून वंशाचा दिवा हवा म्हणून हट्ट सुरु झाला. पुढे, सासऱ्याची वाईट नजर नेहावर पडली. पती नसताना तो नेहाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. नेहाने त्याच्या तावडीतून सुटका करत ही बाब पतीच्या कानावर घातली. मात्र, पतीने तिचे काहीही ऐकून न घेता उलट तिलाच मारहाण केली. तिचे घराबाहेर पडणे बंद केले. कुटुबीयांशी संवाद तोडला. हे अत्याचार सहन करत नेहाने अनेक दिवस उपाशीपोटी काढले.
एमआयडीसी अधिकाऱ्यांंकड़ून हुंड्यासाठी मध्यस्थीएमआयडीसीमध्ये अधिकारी पदावर असलेल्या महिलेनेही अश्लील संवाद साधत सासूपासून विभक्त असलेल्या सासऱ्याच्या विकृतीला प्रोत्साहन दिले. शिवाय, हुंड्यासाठी मारहाण केल्याचा आरोपही नेहाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला.
अद्याप अटक नाही माहीम पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अद्याप कुणाला अटक करण्यात आली नसल्याचे सांगितले.
मला न्याय मिळेल का?सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा विचार आला. मात्र, हिमतीने पुढाकार घेतला. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी महिना लावला. पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांच्याकडे गेल्यामुळे किमान गुन्हा दाखल झाला. मात्र, सध्या न्यायासाठी पायऱ्या झिजवण्याची वेळ आल्याचे नेहाचे म्हणणे आहे. मला खरच न्याय मिळेल का, असा सवाल तिने केला आहे. अटकेसाठी टाळाटाळ करत असल्याचे नेहाचा आरोप आहे.
महागड्या गाडीसाठी ५० लाखांची मागणी वंशाच्या दिव्यासाठी हट्ट सुरु असताना नवीन गाडीसाठी ५० लाखांची मागणी सुरु झाली. आई-वडिलांनी त्यांचे घर विकून पैसे द्यावे, असा तगादा नेहाकडे सुरु झाला. दरम्यान, लग्नानंतर, मुलगी सुखात नांदावी म्हणून नेहाच्या आई- वडिलांनी २५ तोळे सोने आणि रक्कमही दिली होती.
पती निघाला दहावी पास आणि आजारीही...हा छळ सुरु असतानाच नेहाच्या हाती लागलेली काही कागदपत्र वाचून तिला धक्का बसला. यात, पतीवर मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरु असून, त्याच्या जेनेटिक समस्येबाबतही नमूद होते, असे नेहाने सांगितले. तसेच त्याचे दहावीपर्यंत शिक्षण झाल्याचे नेहाचे म्हणणे आहे.
- सासऱ्याने केलेल्या अत्याचाराच्या प्रयत्नानंतर लग्नात भाऊ म्हणून उभ्या राहिलेल्या व्यंकटेश वोरा नावाच्या व्यक्तीनेही नेहाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. अखेर, दोन महिन्यांनी नेहाने तेथून पळ काढत माहेर गाठले. तिने आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगताच त्यांना सोबत घेऊन पोलिसांत धाव घेतली.