औरंगाबाद : रेकॉर्डवरील आरोपीने वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटल्यानंतर लुटारू दुचाकीवरून जिल्ह्याबाहेर पळून जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर दोन पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. तेव्हा आरोपीने पोलिसांवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. ही घटना मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान घडल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
शक्तूर लष्करी भोसले (२५, रा. गाजगाव, ता. गंगापूर) असे आरोपीचे नाव आहे. तुर्काबाद - जिकठाण रोडवरील शिवारात सोमवारी सायंकाळी एका वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत मंगळसूत्र, कानातले कुडकेसह रोख रक्कम हिसकावून त्याने पोबारा केला होता. भोसलेला पकडण्यासाठी वाळूज पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखेची पथके तैनात होती. रात्रभर पाच ठिकाणी छापे मारून भोसलेची माहिती जमा केली. तो कुटुंबासह दुचाकीवरून पळून जाणार असल्याची माहिती एनडीपीएसचे अंमलदार धर्मराज गायकवाड, सुरेश भिसे यांना मिळाली. दोघांनी भोसलेचा १० किलोमीटर पाठलाग केला. भोसले एका झुडपात दुचाकी सोडून देऊन मोकळ्या मैदानात पळू लागला.
पोलिसांनी पाठलाग सुरु केला. गाठल्यानंतर त्याने दोन चाकूंच्या सहाय्याने पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनी शिताफीने त्यास पकडले. तोपर्यंत उपनिरीक्षक अजित दगडखैर, अमोल म्हस्के यांची पथके पोहोचली. या आरोपीकडून वृद्ध महिलेचे लुटलेले सोने, पैशांसह इतर मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई निरीक्षक आघाव यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक दगडखैर, म्हस्के, अंमलदार धर्मराज गायकवाड, सुरेश भिसे, दादासाहेब झारगड, नितीन देशमुख, राजाराम डाखुरे, अजय चौधरी आदींनी केली.
आरोपीवर आठ गुन्हे दाखल
शक्तूर भाेसले याच्यावर विविध पोलीस ठाण्यात तब्बल आठ गुन्हे दाखल आहेत. त्यातील बहुतांश गुन्हे दरोड्याचे आहेत. त्यातील सिल्लेगाव ठाण्यात चार, गंगापूर, वैजापूर, पूर्णा व वाळूज पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे.