केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावे फसवणूक करणार विराज शहाला आग्र्यामध्ये पकडण्यात आले. विराज शहा, आग्र्याचे दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेंद्र उपाध्याय यांना जाळ्यात ओढून ठकविण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, त्यांना संशय आल्याने त्यांनी या ठकाला पोलिसांच्या हवाली केले.
योगेंद्र उपाध्याय यांनी विराज शहा याच्याविरोधात नाई की मंडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गेल्या पाच सहा दिवसांपासून विराज शहा उपाध्याय यांना फोन करत होता, तसेच आपण अमित शहा याचा पाहुणा असल्याचे सांगत होता. त्याच्या कुटुंबाला आग्र्यामध्ये हॉटेल खरेदी करायचे आहे. यासाठी तो आमदारांच्या घरी आला आणि यावर चर्चा केली. यानंतर काही शॉपिंग करायची असल्याचे सांगितले. यानंतर तो आमदारांच्या मुलासोबत शॉपिंग करण्यासाठी मार्केटमध्ये गेला.
विराज शहा याने बाजारातील एका रेडिमेड कपड्यांच्या दुकानातून ४०००० रुपयांची खरेदी केली. यानंतर त्याच्यासोबत आलेल्या आमदार पुत्राला त्याचे बिल पेड करायला सांगितले. आमदार पुत्राने जेव्हा ही बाब आमदार उपाध्यायांना फोनवर सांगितली तेव्हा त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. यानंतर त्यांनी विराजला पकडण्यासाठी जाळे विनले. उपाध्याय यांनी त्याचा फोन नंबर गुगल पेवर टाकला आणि माहिती काढायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना या व्यक्तीने अनेकांना फसविल्याचे समजले.
खरेदीचे कपडे घरी पाठविण्यास सांगितलेगुगलवर माहिती मिळविण्याआधी उपाध्याय यांनी मुलाला सांगितले ती, त्याने खरेदी केलेले कपडे घरी पाठव आणि विराज शाहला देखील घरी घेऊन ये. विराज शहाला त्याला घरी का बोलावले जात आहे, याची कल्पनाही आली नाही. इकडे आमदारांनी तो घरी पोहोचेपर्यंत पोलिसांना कल्पना दिली होती. विराज घरी येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.