- मंगेश कराळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : वसई परिसरात तीन ठिकाणी एटीएम मशिन तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. या आरोपींमध्ये १ आरोपी अल्पवयीन आहे. या आरोपींकडून तीन गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी दिली आहे.
वसईच्या बाभोळा नाका येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन आहे. या एटीएम मशीनमधील रोख रक्कम चोरी करण्याच्या उद्देशाने आरोपींनी एटीएममध्ये प्रवेश करुन रॉडच्या सहाय्याने मशिनचा चेेस्ट कॅबीनेटचा दरवाजा व कॅश डिस्पेंसर तोडुन मशीनमधील कॅश चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. बँक मॅनेजर प्रगती अनिकेत सावंत यांनी २० जुलैला माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत एटीएम मशिन तोडुन त्यातील रक्कम चोरीचे प्रकार घडत असल्याने सदरच्या चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी वरीष्ठांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने घडलेल्या गुन्हयांचे घटनास्थळी भेट देवून तांत्रिक तपास करत गुन्हा उघडकीस आणण्याचा गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस कसोशीने प्रयत्न करत होते.
पोलिसांनी घटनास्थळी व येण्या-जाण्याचे मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजचे परीक्षण करुन गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या वाहनांचा नंबर निष्पन्न केले. सदर कार आचोळे डोंगरी परीसरात उभे असल्याचे दिसुन आले. त्या कारच्या आजूबाजूला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून थांबले होते.सहा आरोपी ती कार चालू करून त्यात बसत असताना पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास केला. आरोपी रोहीत उर्फ डी रसल डिसोझा, प्रभु उर्फ बदक विनोदकुमार चौहाण, साहील बुधराम टाक, सोनु नयनसिंग परीयार, कौशिक विजय यादव आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक या सहा आरोपींनी सदर गुन्हा केल्याचे कबुली दिली. या आरोपींनी वालीव येथे २ आणि माणिकपूर येथे १ असे तीन गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. आरोपींकडून चार चाकी गाडी, एक मोबाईल आणि कटावणी असा एकुण ५ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी रोहीत उर्फ डी रसल डिसोझा हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर तुळींंज व विरार येथे दिवसा व रात्रीच्या घरुफोडीचे ६ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, सहाय्यक फौजदार संजय नवले, रमेश भोसले, पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, सुधीर नरळे, दादा आडके, प्रशांतकुमार ठाकुर, अमोल कोरे, माणिकपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस हवालदार धनंजय चौधरी, सायबर शाखेचे संतोष चव्हाण, रमजान नसीर खान, रामेश्वर केकान, अविनाश चौधरी यांनी केली आहे.