मुंबई - रेल्वेपोलिसांनी लोकमान्य टिळक टर्मिनसवर येणाऱ्या प्रवाशांना लुटणाऱ्या दुकलीला जेरबंद केलं आहे. संजय पटेल आणि अरविंद प्रसाद अशी या अटक आरोपींची नावे असून हे दोघेही जण मूळचे बिहारचे आहेत. या दोघांनी कमीत कमी 12 प्रवाशांना लुटल्याचं पोलिसांजवळ कबूल केलं आहे. मात्र पोलिसांना या दोघांकडून अजून गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.
8 मार्च रोजी निलेश सोमवंशी आणि सचिन गायसमुद्रे या आरपीएफ जवानांना एलटीटीवर गस्त घालत असताना संजय पटेल आणि अरविंद प्रसाद यांची संशयास्पद हालचाल दिसली. हे दोघे जण तिकीट रिझर्वेशन सेंटरजवळ प्रवाशांसी उगाच बोलत असल्याचं या पोलिसांना दिसून आलं. त्यावेळी पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी सुरू केली. सुरुवातीला या दोघांनी आपण पनवेल येथील एका फॅक्टरीमध्ये काम करत असल्याचं सांगितलं. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या दोघांची पोल खोल झाली. पोलिसांनी या दोघांची झडती घेतली. अंगझडतीमध्ये त्यांना या दोघांकडे क्रीम बिस्कीटांचे 3 पुडे सापडले. तपासादरम्यान या बिस्कीटांमध्ये त्यांनी गुंगीचे औषध मिसळले असल्याची माहिती उघड झाली. गेल्या काही दिवसांमध्ये एलटीटीवर प्रवाशांना लुटल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघे आरोपी उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांशी रिझर्वेशन करतेवेळी जवळीक साधायचे. त्यांना चहा पाजण्याच्या बहाण्याने घेऊन जायचे आणि त्यांना चहासोबत बिस्कीट खायला घालायचे अशी या आरोपींची मोडस ऑपरेंडी होती. बिस्कीटं खाल्ल्यानंतर प्रवासी बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्याजवळ असलेला सगळा माल लुटून दोघे फरार होतं.