बंगळुरू येथील एआय इंजिनिअर अतुल सुभाष याच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी पत्नी निकिता सिंघानिया आणि तिच्या कुटुंबीयांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. याच दरम्यान, अतुलचे वकील आकाश जिंदाल यांची प्रतिक्रिया आली आहे. मुलाच्या नावावर निकिताला जामीन मिळू नये, असं आवाहन आकाश यांनी केलं आहे. जामीन मिळवण्यासाठी ती मुलाचा शस्त्र म्हणून वापर करू शकते. तिला हे करू देऊ नये असं म्हटलं आहे.
अतुलच्या आई आणि वडिलांनी त्यांच्या चार वर्षांच्या नातवाच्या ताब्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अतुलचा मुलगा अद्याप बेपत्ता असून, पोलिसांना त्याचा शोध घेता आलेला नाही. निकिता सध्या आपल्या कुटुंबासह जेलमध्ये आहे. तिने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. जामीन अर्जावर पुढील सुनावणी ४ जानेवारी रोजी होणार आहे. त्यांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अतुलचे वकील आकाश म्हणाले, निकिता आणि तिच्या कुटुंबीयांनी जामीन अर्ज केला आहे. न्यायालयीन प्रक्रियेपासून वाचण्यासाठी निकिताने आपल्या मुलाचा शस्त्र म्हणून वापर केल्याचं देखील अतुलने त्याच्या आत्महत्येच्या व्हिडिओमध्ये नमूद केलं होतं. असं व्हायला नको पण ती तसंच करत आहे.
वकिलाने सांगितलं की, निकिताच्या वकिलाने असा युक्तिवाद केला आहे की, आम्ही मुलाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पण, हे सत्य नाही. निकिता आणि तिचं संपूर्ण कुटुंब जेलमध्ये आहे. मुलाची काळजी घेणारं कोणीच नाही. निकिताला फरार असताना अटक करण्यात आली होती, जर तिला जामीन मिळाला तर ती पुन्हा मुलासह फरार होण्याचा प्रयत्न करेल. अशा परिस्थितीत न्यायालयीन प्रक्रियेतून दिलासा मिळावा म्हणून तिला मुलाचा शस्त्र म्हणून वापर करू देऊ नये असं म्हटलं आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ४ जानेवारीला होणार आहे.