एआय सॉफ्टवेअर इंजिनिअर अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. आरोपी निकिता सिंघानिया, निशा आणि अनुराग यांची न्यायालयीन कोठडीही ३० डिसेंबरला संपणार आहे. निकिता सिंघानिया, निशा आणि अनुराग यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.
याप्रकरणी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या प्रकरणात जौनपूर न्यायालयाची जुनी कागदपत्रं समोर आली आहेत. निकिताने यामध्ये आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. याशिवाय निकिताने अतुलवर अनेक गंभीर आरोपही केले आहेत. निकिताने अतुलच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. निकिता स्वतः घरातून निघून गेल्याचं अतुलने सांगितलं होतं.
स्पष्टीकरण देताना निकिता म्हणाली होती की, तिने घर सोडलं नव्हतं. अतुलनेच तिला घराबाहेर काढलं होतं. अतुलने मला दोनदा घराबाहेर फेकलं होतं. त्याने मे २०२१ मध्ये मला घराबाहेर काढलं होतं. यानंतर मला वाटलं त्याला आपली चूक समजली असेल म्हणून मी सप्टेंबर २०२१ मध्ये बंगळुरूला गेले पण तेव्हाही त्याने मला घरात येऊ दिलं नाही. त्यामुळे मला पोलिसांत तक्रार करावी लागली.
कोर्टात स्पष्टीकरण देताना निकिता म्हणाली होती, १७ मे २०२१ रोजी अतुलने माझ्या आईसमोर मला मारहाण केली. याच दरम्यान त्याने माझ्या आईसमोर मला लाथ मारली आणि धक्काबुक्की केली. यानंतर त्याने मला आणि आईला घरातून हाकलून दिलं होतं आणि माझे सर्व दागिने, कपडे आणि एफडीची कागदपत्रंही काढून घेतली होती.
दहा लाख रुपये घेऊन ये, तेव्हाच तुला घरात घेईन नाहीतर मारून टाकेन असं अतुलने तिला म्हटलं होतं. बिहारमधील समस्तीपूर येथील रहिवासी असलेल्या अतुल सुभाषने ९ डिसेंबर रोजी बंगळुरू येथील फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी अतुलने २४ पानी सुसाईड नोट आणि दीड तासांचा व्हिडीओ केला होता. यामध्ये अतुलने निकिता आणि सासरच्या मंडळींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता.