अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बंगळुरू पोलिसांची एक टीम यूपीतील जौनपूर येथे पोहोचली आहे. जौनपूर शहरातील खोया मंडी भागात अतुलचं सासरचं घर आहे, जिथे पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया, राहतात. मात्र, पोलीस तेथे पोहोचले असता त्यांना निकिताच्या घराला कुलूप दिसलं. कारण, निकिताची आई निशा आणि तिचा भाऊ अनुराग एक दिवस आधी घराला कुलूप लावून रात्री कुठेतरी बाहेर गेले होते. अशा परिस्थितीत पोलिसांनी घरावर नोटीस चिकटवली आहे.
आज जौनपूरच्या स्थानिक पोलिसांसह बंगळुरू पोलिसांची टीम तपासासाठी बाहेर पडली. शहरात सुमारे ५ किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर या टीमने कोतवाली पोलीस ठाणे गाठलं आणि येथील स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बंगळुरू पोलिसांच्या टीममध्ये चार सदस्य आहेत. यामध्ये एका महिला पोलिसाचाही समावेश आहे. हे सर्वजण अतुल सुभाष प्रकरणाच्या चौकशीसाठी जौनपूर येथील अतुलच्या सासरच्या घरी आले आहेत. मात्र, अतुलच्या सासऱ्यांचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. त्यांच्या घराला कुलूप आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सॉफ्टवेअर इंजिनिअर अतुल सुभाष याच्या आत्महत्येप्रकरणी जौनपूरला पोहोचलेल्या बंगळुरू पोलिसांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर निकिता सिंघानिया आणि निशा सिंघानिया यांच्या घरी नोटीस चिकटवली आहे. नोटीसमध्ये लिहिलं आहे की, बंगळुरूमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात तुमचा जबाब नोंदवून घ्या.
अतुल सुभाषच्या भावाकडून बंगळुरूमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात पुरावे गोळा करून आरोपीचे जबाब नोंदवून अटक करण्याची तरतूद आहे. आरोपींनी पोलिसांसमोर जबाब नोंदवला नाही तर पोलीस त्यांना अटकही करू शकतात. जबाब नोंदवण्यासाठी ३ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
अतुल सुभाष याच्या आत्महत्येप्रकरणी पत्नी निकिता सिंघानियासह सासू निशा सिंघानिया यांनाही आरोपी बनवण्यात आल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत महिलांची चौकशी करण्याच्या तयारीत असताना बंगळुरू पोलिसांनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्यालाही सोबत आणलं आहे. सध्या त्यांचा शोध सुरू आहे. पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा, पत्नीचा भाऊ अनुराग आणि पत्नीचा काका सुशील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.