मुंबई - मुंबईतल्या एका कपडे व्यापाऱ्याला व्यवहारात नफा देण्याचे आमीष दाखवून त्याला ऑइलऐवजी 30 लाखाचे पाणी विकून फसवणूक करणाऱ्या नायझेरियन चोरासह एकाला अटक करण्यात ना.म. जोशी मार्ग पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ना.म.जोशी मार्ग परिसरात राहणारे तक्रारदार इश्वर रामाणी यांचा कपड्याचा व्यवसाय आहे. रामाणी यांना काही दिवसांपूर्वी एक फोन आला होता. त्यावेळी फोनवरील व्यक्तीने इंग्लडमध्ये कॉस्मॅटिक ऑईलला मोठी मागणी असते. भारतात त्याची किंमत कमी असून हे इंग्लडमधील कंपनीला तुम्ही भारतातून हे ऑईल खरेदी करून विकले. तर दलाली स्वरूपात मोठी रक्कम पदरात पडू शकते असे आमीष दाखवले. त्यानुसार मनात लालसा निर्माण झाल्याने व्यापाऱ्याने हा व्यवहार करण्याचे पक्के केले. मात्र, समोरील व्यक्तीने पहिल्यांदा नमुना म्हणून 68 हजार रुपयांचे ऑइल पैसे घेऊन पाठविले. ते तपासणीत पास झाल्यानंतरच कंपनीकडून ऑर्डर घेतली जात असल्याचे सांगितले. त्यानुसार व्यापाऱ्याने पहिल्यांदा नमुना स्वरूपात ते ऑइल घेवून ते तपासणीसाठी त्या नायझेरियनला दिले. काही तासातच ऑइलचे नमूने पास झाले असून कंपनीने 30 लिटर ऑइल पाठवल्याचा मेल फोनवरील व्यक्तीने रामाणी यांना पाठवला. त्यानुसार रामाणी यांनी 12 आणि 13 डिसेंबरला वेगवेगळ्या स्वरूपात 30 लाख रुपये देऊन ऑइल खरेदी केले. मात्र, ऑइल कंपनीत ऑइल कमी असल्याचे कारण देऊन तेथून फक्त 17 लिटर ऑइल पाठवले. उर्वरित ऑइल लवकरच पाठवतो असे रामाणी यांना सांगण्यात आले. याच दरम्यान इंग्लंडमध्ये ज्या कंपनीशी रामाणी यांनी व्यवहार केला. त्या कंपनीकडून 60 लिटर ऑइल पाहिजे असल्याचा मेल केला. त्यानुसार रामाणी यांनी भारतातील ऑइल पुरवठादाराकडे विचारणा केली असता. त्यासाठी आगाऊ रक्कम मोजावी लागले असे भारतातील त्या ऑइल कंपनीच्या एजंटला सांगितले. दरम्यान या व्यवहाराबाबत रामाणी यांना संशय येऊ लागला. या व्यवहाराबाबत त्यांनी आपल्या एका जवळच्या मित्राला सांगितल्यानंतर त्याने संबंधित खरेदी केलेले ऑइल हे नेमके काय आहे ते पाहण्यासाठी सांगितले. रामाणी यांनी ऑईलचे कॅन फोडल्यानंतर त्याच्या लक्षात आले की लाखो रुपये खर्चून खरेदी केलेल्या त्या कॅनमध्ये ऑइल नसून पाणी असल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रामाणी यानी पोलिसात धाव घेतली. एन. एम. जोशी पोलिसांनी रामाणी यांना समोरील व्यवहार सुरू ठेवण्यास सांगून आरोपींना गाफिल ठेवण्यास सांगितले. तसेच पुढील ऑर्डर कॅश स्वरूपात देण्यात येईल असे कळवले. दरम्यान, हॅन्ड्री नावाचा नायझेरियन पैसे घेण्यासाठी आला असताना पोलिसांनी त्याला अटक केली. त्या नायझेरियन तरुणाच्या चौकशीतून त्या टोळीत सहभागी असलेल्या एका भारतीय तरुणाला ही ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून न्यायालयाने दोन्ही आरोपींना 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.