मुंबई - गेल्या वर्षापासून चर्चेत असलेल्या कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम व त्याच्या कुटुंबीयांची दक्षिण मुंबईतल्या पाकमोडिया स्ट्रीट येथील मालमत्तेचा लिलाव अखेर ९ ऑगस्टला होणार आहे. पाकमोडिया स्ट्रीटवरील तीन मालमत्तांपैकी एका मालमत्तेचे केंद्र सरकारच्यावतीने हा लिलाव आयोजित करण्यात आले आहे. भेंडीबाजार येथे दाऊदची मासुल्ला इमारत आहे. या इमारतीचा लिलाव यशवंतराव चव्हाण सभागृहात ९ ऑगस्टला सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान पार पडणार आहे. त्यासाठी वर्तमानपत्रांमध्ये निविदापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. ७९ लाख ४३ हजार अशी राखीव किंमत ठेवण्यात आली असून या किंमतीपुढे बोली लागणार आहे.
या लिलावात सहभाग घेणाऱ्यांना ६ ऑगस्टपर्यंत २५ लाख अनामत रक्कम भरावी लागणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या नोटिसीत म्हटले आहे. दाऊदची ही मालमत्ता ई-लिलाव, जाहीर लिलाव आणि बंदिस्त निविदीच्या माध्यमातून लिलावात काढण्यात येईल. या लिलावात कोण कोण बोली लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी २०१५मध्ये पाकमोडिया स्ट्रिटवरील दाऊदच्या दिल्ली जायकासाठी बोली लावण्यात आली होती. त्यावेळी एकाने ते हॉटेल ४ कोटी २८ लाखांची बोली लावून खरेदी केले होते. मात्र किमान रक्कम जमा करू न शकल्यामुळे अर्थमंत्रालयाने ती मालमत्ता पुन्हा ताब्यात घेतले होते.