औरंगाबाद : शहरात तेलंगणा राज्यातील निजामाबादेतून पुरवठा होणाऱ्या गुंगीच्या औषधी गोळ्यांचा साठा गुन्हे शाखेने छापा मारून जप्त केला. आरोपी एम. राजेंद्र (निजामाबाद) यास सोमवारी ताब्यात घेतले.
नवजीवन कॉलनी, हडको येथून एका जणाला ५ लाख रुपये किमतीच्या गुंगी, नशा आणणाऱ्या औषधी, गोळ्यांचा साठा बाळगणारा सागर बाबूराव शिंदे याला गुन्हे शाखेने दि. १९ मार्चला अटक केली. शाहीद रज्जाक गडबडे यास ताब्यात घेऊन त्याने दिलेल्या माहितीवरून गुन्हे शाखेचे पथक तेलंगणा राज्यात गेले. गडबडे याने गणेश मेडिकल एजन्सीकडून गुंगी, नशा आणि उत्साहवर्धक गोळ्या कोणत्याही नियमाचे पालन न करता खरेदी केल्या होत्या. गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोलीस नाईक विठ्ठल सुरे, संजयसिंह राजपूत, पोलीस शिपाई ओमप्रकाश बनकर, नितीन देशमुख, धर्मराज गायकवाड, पंढरीनाथ जायभाये, अमर चौधरी यांनी छापा मारून ३ लाख २ हजार ९४० रुपयांच्या औषधी, गोळ्या जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेतर्फे देण्यात आली.
तेलंगणा येथे सापळा यशस्वीअन्न व औषधी निरीक्षक बी. प्रवीण, माधव निमसे यांच्या मदतीने सापळा रचून शहर गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. गणेश मेडिकल एजन्सीचे मालक एम. राजेंद्र याची चौकशी सुरू आहे.