कल्याण - सध्याच्या स्वार्थी जगात कोणी कोणाचं नसतं मात्र आजही माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय कल्याणमध्ये आला. रिक्षामध्ये विसरलेल्या प्रवाशाचे तब्बल १ लाख रुपयांचे दागिने कल्याणमधील रिक्षा चालकाने परत केल्याने त्याच्या या प्रामाणिकपणाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
कल्याण पूर्वेतील सूचक नाका येथून जेष्ठ नागरिक परमेश्वर मेनन हे एम.एच. ०५. डी.एल. ५२४५ या रिक्षाने प्रवास करत होते. यावेळी आपल्या इच्छीत स्थळी ते उतरले मात्र त्यांच्याजवळ सुमारे एक लाखांचे दागिने आणि महत्वाचे कागदपत्र असलेली बॅग ते रिक्षातच विसरले. काही वेळानंतर हि बाब रिक्षा चालक रामचंद्र अमरे यांच्या लक्षात आली. यावेळी अमरे यांनी महराष्ट्र रिक्षा पंचायतचे ठाणे जिल्हाध्यक्ष शिवाजी गोरे यांना हा प्रकार सांगितला. शिवाजी गोरे यांनी लागलीच महात्मा फुले पोलीस ठाण्याचे व.पो.नि. प्रकाश लोंढे यांच्याशी संपर्क करत ही बॅग परत करण्यासाठी तयारी दर्शवली. यावेळी लोंढे यांच्या हस्ते हि बॅग प्रवासी परमेश्वर मेनन यांना सुपूर्द करण्यात आली. रिक्षाचालक रामचंद्र अमरे यांनी हि बॅग परत केली म्हणून त्यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी महात्मा फुले पोलीस स्टेशनचे व.पो.नि. प्रकाश लोंढे, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे ठाणे जिल्हाध्यक्ष शिवाजी गोरे, राजू भोसले, रवी कोतलकर, प्रशांत ठाणगे आदी जण उपस्थित होते. आपले दागिने आणि महत्तवाची कागदपत्रे असलेली बॅग परत मिळाल्याने जेष्ठ नागरिक परमेश्वर मेनन यांचा आनंद गगनात मावत नव्हता तर हि बॅग परत करणाऱ्या प्रामाणिक रिक्षा चालक रामचंद्र अमरे यांचे आभार व्यक्त केले आहेत.