सोलापूर : करमाळा शहरात मौलालीचा माळ येथे नगरपालिका पाणीपुरवठा यंत्रणेच्या कंपाउंड लगत एक वृद्ध मृतावस्थेत आढळला. पतीचा मृत्यू अकस्मात नसून खुनाचा संशय व्यक्त करीत पत्नी आणि नातेवाइकांनी खुनाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. अखेर शवविच्छेदन अहवाल आला आणि पोलिसांनी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले. अखेर दोन दिवस तिष्ठत राहिलेल्या मृतदेहावर बुधवारी रात्री अंत्यसंस्कार झाले.
एकनाथ दारशा पवार (वय ६५) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव असून मंगळवार, १३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत त्यांची पत्नी मंगल एकनाथ पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश कोंडीबा जाधव आणि आश्रू दिलीप शिंदे (दोघे रा. करमाळा) यांच्या विरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात त्याच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती.
मंगळवारी सकाळी देवळाली येथील मागासवर्गीय समाजातील एकनाथ दारशा पवार (वय ६५) हे मृतावस्थेत आढळून आले होते. या घटनेनंतर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या पत्नीसह नातेवाइकांनी गर्दी केली होती. निरीक्षणाप्रसंगी मृताच्या मांडीवर तीक्ष्ण हत्याराचे वार आढळून आले. पत्नीसह नातेवाइकांनी खुनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद न करता खुनाचा गुन्हा दाखल करावा यासाठी नातेवाइकांनी आग्रह धरला. त्यासाठी नातेवाइकांनी बुधवारी संध्याकाळपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर शेवटी बुधवारी संध्याकाळी साडेसहा नंतर करमाळा पोलिसांनी मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. अखेर दोन दिवस तिष्ठत पडलेल्या मृतदेहावर बुधवारी रात्री अंत्यसंस्कार झाले.
याबाबत मयताची पत्नी मंगल एकनाथ पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत गणेश कोंडीबा जाधव आणि आश्रू दिलीप शिंदे (दोघे रा. करमाळा) यांनी पती एकनाथच्या खिशातील मोबाइल व रोख रक्कम काढून घेऊन, त्याच्यासोबत वाद घालून तलवारीने त्याच्या मांडीवर वार करून जिवे मारल्याचे फिर्यादी म्हटले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील हे या घटनेचा तपास करत आहेत.