नवी दिल्ली - नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) गुरुवारी देशभरातील गुन्हेगारीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार सन 2018 मध्ये 50,74,634 दखलपात्र गुन्हे घडले आहेत. तर 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये 1.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सन 2017 मध्ये दखलपात्र गुन्ह्यांची संख्या 50,07,044 होती. 2017 साली गुन्हेगारीचे प्रमाण प्रति लाख लोकसंख्येला 388.6 होते. तर 2018 मध्ये कमी होऊन 383.5 झाले आहे. 2018 सालच्या क्राईम रेकॉर्डनुसार भारतात दरदिवसाला 81 खून, 289 अपहरण, 91 बलात्काराचे सरासरी गुन्हे घडले आहेत.
यापूर्वी एनसीआरबीने अलीकडेच 2017 साली घडलेल्या गुन्हेगारीचा अहवाल जाहीर केला होता. त्यानुसार सन 1992 नंतर हत्येचे प्रमाण हळूहळू कमी झाले. सन 1963 नंतर 2017 मध्ये कमी प्रमाण नोंदविण्यात आले. त्यानुसार, एक लाख लोकसंख्येला 2.49 खून नोंदविण्यात आले. 2015 च्या तुलनेत 2017 मध्ये चोरीच्या घटनांमध्येही घट झाली आहे. तसेच 2015 च्या तुलनेत 2017 साली नोंद झालेल्या बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या घटनांची नोंद देखील कमी आहे.
अपहरणाचे गुन्ह्यात 2018 साली 10.3 टक्क्यांनी वाढ झाली असून 105734एफआयआर दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 63356 (15250 मुलं आणि 48106 मुली) लहान मुलं तर 42180 एफआयआर (9415 पुरुष, 32765 महिला) हे 18 वर्षावरील सज्ञान व्यक्तीचे अपहरण केल्याप्रकरणी नोंद आहेत. महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या देखील 2018 साली वाढली असून ती संख्या 378277 इतकी आहे. त्यापैकी 2018 भा. दं. वि. कलम 376 अन्वये नोंद झालेले बलात्काराच्या गुन्ह्याचे प्रमाण 33356 इतके आहे. 2017 साली ती संख्या 359849 इतकी होती.