मुंबई : गेल्या वर्षीच्या डिसेंबर आणि या वर्षीच्या जानेवारी महिन्यात अविनाश पवारचे मोबाइल लोकेशन पुणे आणि बेळगाव असल्याचे तपासात समोर आले आहे. गुन्ह्याच्या वेळी सुधन्वा गोंधळेकर, वैभव राऊत आणि पवार यांनी एकच सिम कार्ड वापरले असून हा मोबाइल तिघांनीही वापरला आहे. याचदरम्यान सनबर्नमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा कट आणि पद्मावत सिनेमाच्या विरोधात बेळगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील कटात अविनाश पवारचा सहभाग समोर येत आहे.१ सप्टेंबर रोजी प्राप्त झालेल्या मोबाइल तपशिलातून ही माहिती एटीएसच्या हाती आली आहे. यामध्ये पवार हा वैभवच्या संपर्कात होता हे स्पष्ट झाले. हा क्रमांक्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या नावावर आहे. एटीएसने संबंधित कार्यकर्त्याचा जबाब नोंदविला आहे. त्यात त्याने या क्रमांकाबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितल्याचा जबाब एटीएसने न्यायालयात सादर केला.न्यायालयाने सिम कार्ड चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला का, असा सवाल विचारताच, एटीएस निरुत्तर होते. जर एखाद्याच्या नावाने सिम कार्ड वापरले जात असेल तर त्याने आक्षेप घेत गुन्हा दाखल करायला हवा होता. तसे का झाले नाही? असे न्यायालयाने एटीएसला फटकारले.३ मोबाइलमध्ये दडलंय काय..?पवारकडून ताब्यात घेतलेल्या अन्य ३ मोबाइलचा तपास बाकी आहे. याबाबत पवारकडून योग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे पवारच्या कोठडीमध्ये चार दिवसांची वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. एटीएसने जुन्याच कारणांवर पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे वाढीव कोठडी देणे योग्य नसल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलाने केला. न्यायालयाने पवारच्या कोठडीत ६ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे.पांगारकरसोबत रेकी... पवारने ज्या ठिकाणी गावठी बॉम्ब बनविले, जेथे एअरगनचे प्रशिक्षण घेतले त्या ठिकाणचा पंचनामा केल्याचे एटीएसने सांगितले. त्यानेही पांगारकरसहित अन्य आरोपींसोबत रेकी केल्याचा संशय व्यक्त केला. पवारकडील सिक्रेट क्रमांक सुधन्वाकडून त्याला देण्यात आला. सुधन्वाला तो क्रमांक वैभवने दिल्याचे समोर आले आहे.माझगाच्या लॉकरमधून डायरी जप्तपवारच्या माझगाव डॉक येथील लॉकरमधून डायरी आणि पत्र जप्त करण्यात आली आहेत. त्या डायरीचे डिकोडिंग झाल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.
बेळगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या कटात अविनाश पवारचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 2:25 AM