लखनौ – उत्तरप्रदेशच्या मोहनलालगंजचे भाजपा खासदार कौशल किशोर सिंह यांच्या मुलावर गोळी झाडल्याच्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. स्वत:वर गोळी झाडल्याचा आरोप असलेला आयुष किशोर सध्या फरार आहे तर पोलिसांनी गोळी चालवल्याचा आरोपाखाली त्याच्या मेव्हण्याला अटक केली आहे. आता मेव्हण्याने आरोप लावलाय की, आयुषने स्वत:वर गोळी चालवण्याचा प्लॅन बनवला होता.
आता मेव्हण्याच्या आरोपानंतर आयुषने व्हिडीओ जारी करत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आयुष म्हणालाय की, मला माझी पत्नी अंकिताने फसवलं आहे तर अंकिता सिंहचं म्हणणं आहे की, खासदाराचं कुटुंब मला स्वीकारण्यास तयार नाही आणि मला मारण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. आयुषने व्हिडीओत दावा केलाय की, मी सरेंडर करेन, मी कोणतंही चुकीचं काम केले नाही, मी स्वत:ला गोळी मारली नाही. जर मी त्यादिवशी घरी असतो तर माझी हत्या झाली असती, माझ्या जेवणात विष दिलं होतं, मी सलग तीन दिवस नशेत होतो, लखनौमधून बाहेर पडल्यानंतर मी ३ दिवस नशेत होतो, मी स्वत:वर उपचार केलेत. आताही माझी मानसिक स्थिती बरोबर नाही. त्या मुलीने मला वेडे केले आहे असं म्हटलंय.
आयुषने आणखी एक व्हिडीओ जारी करत सांगितलंय की, ६ महिन्यापर्यंत मी माझं जीवन आरामात जगत होतो, परंतु या मुलीने मला फसवलं, त्यानंतर माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आज ती माझ्या वडिलांनी म्हणतेय मला सूनेचा दर्जा द्या. या देशात अनेक मुलामुलींचे हे काम आहे. अंकिताने पैशासाठी हनी ट्रॅप केलंय, चांगल्या घरातील मुलांना जाळ्यात ओढणं हे त्यांचे काम आहे. या व्हिडीओमुळे खासदार मुलावर गोळी झाडण्याचं प्रकरण आणखी रहस्यमय बनत चाललं आहे.
याचदरम्यान, आयुषची पत्नी अंकिता सिंह आणि आयुषचे मोठे भाऊ विकास किशोरने एका हिंदी वृत्तवाहिनीवर त्यांची आपापली बाजू मांडली, अंकिता सिंह म्हणाली की, मला फसवण्याचं कटकारस्थान आहे. आयुषने मला तुला उद्ध्वस्त करेन, तुझं भविष्य खराब करेन अशी धमकी दिली होती, जर तू माझ्या भावाविरोधात विधान केले तर मी तुला फसवेन असं आयुष म्हणाला होता. आता माझ्यासोबत कोणीच नाही. मी पूर्णपणे एकटीच आहे. मी आयुषची पत्नी आहे मला पत्नीचा दर्जा हवाय, ८ महिन्यापूर्वी आयुषसोबत माझं लग्न झालंय, आयुषसाठी जे जे करायचं होतं ते मी केलं आहे. लग्नाआधी मला हे माहिती नव्हते की आयुष नशा करतो, त्याचे मित्र त्याला हॉटेलमध्ये घेऊन जात दारू पाजत होते. मी आणखी काही सांगितले तर खूप इज्जत जाईल असंही अंकिताने सांगितले.
अंकिताने भावाला मारण्याचा प्लॅन केला – विकास किशोर
दुसरीकडे आयुष किशोरचा भाऊ विकास म्हणाला की, माझा भाऊ व्हिडीओत जे काही सांगत आहे ते सत्य आहे, अंकिताने आयुषसोबत नाही तर खासदाराच्या मुलाशी लग्न केले, लग्नानंतरही आम्ही त्यांना घरात येण्यापासून रोखले. आमचं पूर्ण कुटुंब या लग्नापासून आनंदी नव्हते, अंकिताने आयुषला फसवलं, अंकिता आणि त्यांची माणसं आयुषची हत्या करू इच्छितात. पण त्यात त्यांना यश येणार नाही, अंकिता आता काहीही कहानी बनवत आहे. आयुषवर लग्नासाठी दबाव टाकला होता असा आरोप विकास किशोर यांनी केला आहे. पोलीस सध्या या हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास करत आहेत, कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे शोधण्याचं पोलिसांसमोर आव्हान आहे, सध्या पोलीस आयुषला पकडण्यासाठी प्रयत्न करतायेत.