बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाचा महाराष्ट्र पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी सातत्याने कारवाई सुरू आहे. हत्येनंतर फरार झालेला शिवकुमारलाही आता पोलिसांनी पकडलं आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येतील मुख्य शूटर शिवकुमार गौतम आणि त्याला आश्रय देणाऱ्या त्याच्या साथीदारांना बहराइचमधून अटक करण्यात आली. यूपी एसटीएफसोबतच्या संयुक्त कारवाईत मुंबई पोलिसांना हे मोठं यश मिळालं आहे.
यूपी एसटीएफ आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने अजित पवार गटाचे बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी बहराइच जिल्ह्यातील नानपारा येथून वॉन्टेड शूटर शिवकुमार आणि अन्य ४ जणांना अटक केली आहे. शिवकुमारला पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक तब्बल २१ दिवसांपासून त्याचा शोध घेत होते.
कसं सापडलं शिवकुमारचं लोकेशन?
शिवकुमारचे कुटुंबीय आणि जवळच्या लोकांच्या संपूर्ण डेटा मागवण्यात आला, ज्यामध्ये एकूण ४५ लोकांचा समावेश होता. या ४५ लोकांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात होती आणि हे लोक कुठे जातात, कोणाला भेटतात अशी त्यांची प्रत्येक हालचाल ट्रॅक केली होता. प्रकरणाचा तपास जसजसा पुढे गेला आणि लोकांना ट्रॅक केलं गेलं, तसतसा तपास ४ जणांवर येऊन थांबला, जे शिवकुमारच्या सतत संपर्कात होते.
बाबा सिद्दिकी यांच्यावर १२ ऑक्टोबरच्या रात्री बांद्रा येथील त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन जणांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आलें. याप्रकरणी आतापर्यंत अनेकांना विविध ठिकाणांवरून अटक करण्यात आली आहे.
शिवकुमारला पकडण्यासाठी 'असा' रचला सापळा
अटक करण्यात आलेल्या चार आरोपींवर पोलीस काही दिवसांपासून बारीक लक्ष ठेवून होते, त्यांचं लोकेशन ट्रॅक करण्यात आलं होतं. त्यानंतर गुन्हे शाखेला पुष्टी मिळाली की, हे चार लोक शिवकुमार गौतमला भेटतात आणि त्याच्या सतत संपर्कात आहेत. त्यानंतर गुन्हे शाखेने सापळा रचून शिवकुमारला भेटण्यासाठी या चार जणांची १० तारखेपर्यंत वाट पाहिली. शिवकुमारने ज्या ठिकाणी सेफ हाऊस बांधले होते, त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला होता. शिवकुमार तेथे पोहोचताच गुन्हे शाखा आणि यूपी एसटीएफने त्याला आणि त्याच्या चार साथीदारांना अटक केली आहे.