अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेने आता मोठा खुलासा केला आहे. गोळीबार करणारे हे लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या थेट संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळेच बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे बिश्नोई गँगचाच हात असल्याची खात्री आता अधिकाऱ्यांना झाली आहे. मात्र, हत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
अभिनेता सलमान खानशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे सिद्दिकी यांची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर येत आहे. अनमोल बिश्नोई हा शूटर आणि कट रचणारा प्रवीण लोणकर यांच्या संपर्कात असल्याचं डिजिटल पुराव्यांवरून समोर आलं आहे. अनमोल कॅनडा आणि अमेरिकेतून आरोपींच्या संपर्कात असल्याचा संशय आहे.
स्नॅपचॅटद्वारे उघड झालं मोठं रहस्य
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींशी संवाद साधण्यासाठी अनेक स्नॅपचॅट अकाऊंटचा वापर करण्यात आल्याची माहिती तपास करणाऱ्या पथकाला मिळाली आहे. स्नॅपचॅटच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात होते आणि मेसेजद्वारे संवाद साधल्यानंतर ते लगेचच मेसेज डिलीट करायचे. यातील काही अकाऊंट ही अनमोल बिश्नोईशी जोडलेली आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, आम्ही या अकाऊंटच्या डिटेल्सची चौकशी करत आहोत, परंतु आम्हाला खात्री आहे की, एक अकाऊंट हे बिश्नोईशी संबंधित आहे. आरोपींकडून चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
चार मोबाईल केले जप्त
घटनास्थळावरून गुन्हे शाखेने चार मोबाईल जप्त केले असून ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. आता गुन्हे शाखेला तेथून फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाला असून त्यात आरोपींच्या फोनच्या मिरर इमेजचाही समावेश आहे. या अहवालात स्नॅपचॅट ऍप्लिकेशनच्या चॅट्सच्या रिट्रीव्हची कॉपी असल्याचं सूत्रांनी सांगितलं. चॅट्सचं एनलायजेशन करताना अनमोल बिश्नोईच्या सहभागाचे पुरावे गुन्हे शाखेला मिळाले आहेत.