अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. मुंबई क्राइम ब्रँचच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड स्टार सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यापासून लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट रचला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबारानंतर दहा दिवसांनी बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या कट रचायला सुरुवात झाली होती. एकीकडे मुंबई क्राईम ब्रँच सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात व्यस्त असताना दुसरीकडे लॉरेन्स गँगने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट रचला.
लॉरेन्स बिश्नोई गँगचा प्लॅन सलमान खानला मारण्याचा होता, पण त्यात यश न आल्याने लॉरेन्सने त्याच्या घरावर गोळीबार करून त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला, अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर बिश्नोई गँगने आपल्या गुंडांना सलमान खानच्या जवळच्या लोकांना लक्ष्य करण्यास सांगितलं होतं. या योजनेअंतर्गत बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट रचला गेला.
डब्बा कॉलिंगद्वारे प्लॅनिंग
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवेळी गँगमधील सदस्यांनी एकमेकांशी बोलण्यासाठी डब्बा कॉलिंगचा (बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज) वापर केल्याचंही चौकशीदरम्यान समोर आलं आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवेळी बिश्नोई गँगने गोळीबार करणाऱ्यांशी आणि त्यात सामील असलेल्या त्यांच्या साथीदारांशी संवाद साधण्यासाठी हायटेक डब्बा कॉलिंग सिस्टीमचा वापर केल्याचं मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात समोर आलं आहे.
या डब्बा कॉलिंगचा वापर करून, अनमोल बिश्नोईने शूटर शिवकुमार गौतम, झिशान अख्तर, शुभम लोणकर आणि सुजित सिंह यांच्याशी अनेकदा चर्चा केली होती. गँग डब्बा कॉलिंगचा वापर करते जेणेकरून तपास यंत्रणा त्यांचा शोध घेऊ शकत नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डब्बा कॉलिंगसाठी स्वतःचे टेली एक्सचेंज सुरू केलं आहे, ज्याद्वारे चार-पाच लोक एकाच वेळी कनेक्ट होऊ शकतात.