अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात, मुंबई गुन्हे शाखेने उघड केलं आहे की, त्यांच्या हत्येचा मास्टरमाइंड अनमोल बिश्नोई आहे. अनमोल हा गुजरातमधील साबरमती जेलमध्ये असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे. तो सिग्नल App वापरून आरोपींशी बोलत असे, त्यांना सूचना देत असे. या प्रकरणात आतापर्यंत २६ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर अनमोल, शुभम आणि झीशान फरार आहेत.
सूत्रांनी दावा केला आहे की तपासादरम्यान, गुन्हे शाखेला असंही आढळून आलं की, अनमोल शुभम, झीशान अख्तर, आकाशदीप गिल या तीन शूटरशी सर्वात जास्त बोलला होता. गुन्हे शाखेच्या म्हणण्यानुसार, या काळात अनमोलने सिग्नल App द्वारे कॉल आणि मेसेजद्वारे सर्व आरोपींशी बोलून त्यांचं ब्रेनवॉश केलं होतं.
अनमोलने त्यांना सांगितलं होतं की, "तो धर्म आणि समाजाच्या भल्यासाठी बाबा सिद्दिकी यांना मारणार आहे. बाबा सिद्दिकी यांचा सलमान खान, दाऊद इब्राहिमशी संबंध आहे आणि दोघांनी मिळून अनुज थापनला मारलं आहे." आरोपपत्रानुसार, संभाषणादरम्यान सर्व आरोपी अनमोलला 'भाई' म्हणत असत.
आरोपपत्रात आणखी एक खुलासा झाला आहे की, अनमोल बिश्नोईच्या सूचनेवरून पंजाबमधून अटक करण्यात आलेल्या आरोपी आकाशदीप गिलने हत्येसाठी पैशांची व्यवस्था केली होती. अनमोल बिश्नोईच्या सूचनेनुसार, आरोपी गिलने पैशांची व्यवस्था केली आणि नंतर फरार आरोपी शुभम लोणकरला ३ लाख रुपये पाठवले होते.
अटक करण्यात आलेल्या आरोपी सलमान वोहराच्या नावाने कर्नाटक बँकेत उघडलेल्या खात्याद्वारे शुभम लोणकरला हे पैसे मिळाले. नंतर अनमोल बिश्नोईच्या सूचनेनुसार हे पैसे महाराष्ट्रातील शुभम लोणकरने बाबा सिद्दीकीच्या हत्येत सहभागी असलेल्या इतर आरोपींना पाठवले. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी यूपीमधून येणाऱ्या पैशाचा शोध घेण्यातही गुन्हे शाखेला यश आलं आहे.