बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने बुधवारी हरियाणातील कैथल येथून एका तरुणाला अटक केली. अमित कुमार असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो कलयातच्या बाता गावचा रहिवासी आहे. झिशान अख्तरला भाड्याने घर मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा आरोप अमितवर आहे. यापूर्वी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी कैथलच्या गुरमेलला घटनास्थळावरून अटक करण्यात आली होती.
अख्तरने १५ महिन्यांपूर्वी जेलमध्ये या दोन जणांना आपला मित्र बनवलं होतं, असं सांगितलं जात आहे. कैथलच्या कलायत शहरात एका आरोपीवर गोळीबार केल्याप्रकरणी शस्त्र पुरवल्याच्या आरोपावरून कैथल पोलिसांनी झिशान अख्तरला पंजाबच्या कपूरथला जेलमधून आणलं होतं.
मुंबई गुन्हे शाखेने त्यांच्या मुलाला घरातून अटक केल्याचं अमितच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. आमच्या मुलाच्या मोबाईलमध्ये त्याच्यासोबत एका मुलाचा फोटो सापडल्याचं पोलिसांनी आम्हाला सांगितलं आहे. पोलिसांनी आमच्या मुलाचा मोबाईलही काढून घेतला आहे अशीही माहिती दिली. बारावी पास अमितचे आई-वडील दोघेही मजुरीचं काम करतात आणि अमित दारूच्या दुकानात काम करायचा.
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींनी जंगलात केला गोळीबाराचा सराव, कारण...
बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात पोलीस सातत्याने नवनवीन खुलासे करत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत आता आणखी एक मोठी बाब समोर आली आहे. चौकशीदरम्यान पोलिसांना माहिती मिळाली आहे की, बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्याआधी शूटर्सनी कर्जत खोपोली रोडवरील जंगलात पिस्तुलाने गोळीबार करण्याचा सराव केला होता.