अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी शिवकुमारची मुंबई आणि उत्तर प्रदेश पोलीस चौकशी करत आहेत. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सूचनेवरून ही घटना घडली. ज्या व्यक्तीच्या गोळीमुळे बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला तो शिवकुमार असल्याचं तपासादरम्यान समोर आले. त्याने एकूण तीन गोळ्या झाडल्या, त्यापैकी दोन गोळ्या बाबा सिद्दिकी यांना लागल्या. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शिवकुमारने चौकशीदरम्यान सांगितलं की, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सांगण्यावरून त्याने १० लाख रुपयांसाठी बाबा सिद्दिकी यांची हत्या केली होती. बिष्णोई गँगने १० लाखांव्यतिरिक्त शिवकुमारला दर महिन्याला काही रक्कम देण्याचं आश्वासनही दिलं होतं. शिवकुमारला यूपी पोलिसांनी पकडले तेव्हा तो नेपाळला पळून जाण्याचा विचार करत होता. शुभम लोणकर आणि यासीन अख्तर यांनी हत्येसाठी सर्व शूटर्सना शस्त्र, काडतुसे, सिम आणि मोबाईल दिल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं.
अनमोल बिश्नोईच्या सूचनेवरून त्याने बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण घडवून आणलं. शुभम लोणकरच्या मदतीने तो अनमोलच्या संपर्कात आला. शिवकुमार आणि आरोपी धर्मराज कश्यप हे एकाच गावचे असून ते पुण्यात भंगार विक्रेते म्हणून काम करत होते. त्यांची दोन्ही दुकानं पुण्यात शेजारी शेजारी होती. शुभम लोणकर याआधीही लॉरेन्स बिश्नोईसाठी काम करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्दीकी यांच्या हत्येनंतर शिवकुमार मुंबईहून पुण्याला परतला होता. प्रकरण वाढल्यावर तो पुन्हा पुण्याहून झाशीला गेला. तेथून ते लखनौमार्गे बहराइच या त्यांच्या गावी गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच आपल्यालाही पोलीस अटक करतील, अशी भीती शिवकुमारला होती. याच कारणामुळे त्याने बहराइच सोडण्याची योजना आखली होती. त्याचा प्लॅन नेपाळला पळून जाण्याचा होता.
बाबा सिद्दिकींवरील हल्ला फेल झाला असता तर पुण्यातील नेता होता टार्गेटवर; बिश्नोई गँगचा प्लॅन B
सिद्दिकी यांच्या हत्येचा प्रयत्न अयशस्वी झाल्यास लॉरेन्स बिश्नोई गँगने प्लॅन बी तयार केला होता. पुण्यातील एका राजकीय नेत्याच्या हत्येचा कट बिश्नोई गँगने रचल्याचा खळबळजनक खुलासा आता करण्यात आला आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान ही बाब समोर आल्याचं मुंबई क्राईम ब्रँचने म्हटलं आहे. क्राईम ब्रँचच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई गँग पुण्यातील एका नेत्याला जीवे मारण्याचा कट रचत होती आणि हा गुन्हा घडवून आणण्याची जबाबदारी प्लॅन बीमध्ये सामील असलेल्या शूटर्सवर देण्यात आली होती.