अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. फाजिल्का येथून अटक करण्यात आलेला आरोपी आकाशदीप गिल याने चौकशीत महत्त्वाची माहिती दिली आहे. बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी रात्री ९ च्या सुमारास मुंबईतील वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, तेव्हा ते त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी याच्या कार्यालयातून बाहेर पडत होते.
मुंबई गुन्हे शाखेच्या चौकशीत आरोपी आकाशदीप गिलने महत्त्वाचे खुलासे केले आहेत. आकाशदीप गिलने सांगितलं की, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात तो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या थेट संपर्कात होता. त्याने दिलेल्या सूचना तो अटक करण्यात आलेले आरोपी सुजित सिंह आणि शिवकुमार गौतम, धर्मराज कश्यप आणि गुरनेल सिंह यांना सांगायचा.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट रचण्यापासून ते हत्येपर्यंत अनेकवेळा अनमोल बिश्नोईशी बोलल्याचंही आकाशदीप गिलने चौकशीदरम्यान उघड केलं. अनमोलच्या सांगण्यावरूनच तो बाबा सिद्दीकी हत्येतील इतर आरोपी शुभम लोणकर आणि झिशान अख्तर यांच्या संपर्कात आला आणि त्यांच्या सूचना गोळीबार करणाऱ्यांपर्यंत पोहोचवू लागला. तो बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या कटात सामील होता.
मुख्य शूटर शिवकुमार गौतम यानेही चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. गौतमने चौकशीदरम्यान सांगितलं की, मुंबईत आल्यानंतर शुभम लोणकरने त्याला टार्गेट कोण आहे हे सांगितलं होतं. तो शुभम लोणकरला तीन वर्षांपासून ओळखतो. पुण्यात शुभमने त्याला एका व्यक्तीला मारायचं असल्याचं सांगितलं होतं.
शुभमने त्याला विचारले होतं की, तू हे काम करायला तयार आहेस का? ज्याच्या उत्तरात गौतमने त्याच्याकडे दोन दिवसांचा वेळ मागितला होता. दोन दिवसांनी गौतम काम करायला तयार झाला आणि त्याने धर्मराज कश्यपलाही त्यात सामील करून घेतलं. त्यानंतर बाबा सिद्दिकीची हत्या सुनियोजित पद्धतीने करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.