बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाचे धागेदोरे पुन्हा एकदा कैथलशी जोडलं गेल्याचं समोर येत आहे. याच दरम्यान झिशान अख्तरचा पोलीस शोध घेत आहेत. झिशानवर कैथलमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. ज्यामध्ये त्याने कलायतच्या एका व्यावसायिकावर गोळ्या झाडणाऱ्यांना शस्त्र पुरवली होती. शूटर गुरमेल सिंह आणि झिशान अख्तर यांची भेट ही कैथल जेलमध्येच झाली होती. त्यानंतर दोघांची जेलमध्येच चांगली मैत्री झाली आणि गुरमेलने झिशानला आपला गुरू मानलं.
पोलिसांनीबाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात गुरमेल सिंहला पकडलं आहे. झिशान अद्याप फरार आहे. तो शस्त्रास्त्र पुरवत होता. त्याच्यावर कलायतमध्ये दोन गुन्हे दाखल होते. हत्येच्या प्रयत्नात शूटर्सना शस्त्रे पुरविण्याच्या दोन गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचं आढळून आलं. ही दोन्ही प्रकरणं अद्याप न्यायालयात प्रलंबित आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कैथल सीआयए पोलिसांनी मे २०२२ मध्ये कलायतच्या एका व्यावसायिकावर गोळीबार केल्याप्रकरणी झिशानला अटक केली होती. यामध्ये झिशान अख्तरने शूटर्सना शस्त्रे पुरवली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झिशान अख्तर जेलमध्ये असताना तो लॉरेन्स गँगच्या संपर्कात आला होता. यानंतर तो तुरुंगातून बाहेर आला आणि पुन्हा गँगमध्ये सामील झाला.
शूटर गुरमेल सिंह याच्यासोबत कैथल जेलच्या स्पेशल सेलमध्ये जवळपास १० महिने राहिला. इथे दोघांची मैत्री झाली. यानंतर झिशानला कोर्टातून जामीन मिळाला. झिशान अख्तर जेलमधून बाहेर आल्यानंतर काही दिवसांनी गुरमेललाही जामीन मिळाला आणि तो अख्तरसोबत मुंबईला गेला. आता या दोघांची नावं बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात समोर आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद आणि झिशान अख्तर हे बाहेरून तिन्ही शूटर्सना दिशा देत होते. सिद्दिकी यांना गोळ्या घालण्यात आल्या तेव्हाही अख्तर शूटर्सना त्याच्या लोकेशनची माहिती देत होता. याशिवाय झिशानने त्यांच्यासाठी खोली भाड्याने देण्यासह इतर लॉजिस्टिक सपोर्टमध्येही मदत केली. याप्रकरणी आतापर्यंत ६ आरोपींची ओळख पटली आहे. यामध्ये गुरमेल, धर्मराज, शिव कुमार, झिशान अख्तर, शुभम लोणकर आणि प्रवीण लोणकर यांच्या नावांचा समावेश आहे.