राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात उपस्थित कार्यकर्त्यांनी तीन हल्लेखोरांपैकी दोघांना पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्याकडून पिस्तुल जप्त करण्यात आली आहेत. या दोन आरोपींची नावे उघड झाली असून हे दोघे बिश्नोई गँगचे असल्याचे सांगितले जात आहे.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला देखील संपविण्याचा प्रयत्न केला आहे. सिद्दीकी हे सलमान खान, शाहरुख खान यांचे जवळचे संबंध होते. आरोपींमध्ये एक हरियाणाचा करनैल सिंह आणि दुसरा उत्तर प्रदेशचा धर्मराज कश्यप आहे. या तिघा हल्लेखोरांना बाबा सिद्दीकींच्या जवळचा असलेल्या व्यक्तीकडून माहिती मिळत होती, असा संशय पोलिसांना आहे. हा व्यक्ती बाबा सिद्दीकी कुठे आहेत, किती वाजता येणार आहेत आदी माहिती देत होता. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. याबाबतचे वृत्त आजतकने दिले आहे.
मुंबई पोलीस सूत्रांनुसार बाबा सिद्दीकींवर हल्ला करण्यापूर्वी तिन्ही आरोपी रिक्षाने घटनास्थळी पोहोचले होते. बाबा सिद्दीकी येण्याची ते वाट पाहत होते. आरोपी गेल्या २५-३० दिवसांपासून त्या भागाची रेकी करत होते. क्राईम ब्रांचला आरोपींनी ते बिश्नोई गँगचे असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, लिलावती ह़ॉस्पिटलचे डॉ. नीरज उत्तमानी यांनी बाबा सिद्दीकी यांचा रक्तदाब बंद होता, नसां तपसल्या तर बंद होत्या. गोळ्या लागलेल्या होत्या. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर झाला होता. आयसीयूमध्ये त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. रात्री ९.३० वाजता त्यांना हॉस्पिटलला आणण्यात आले होते. ११.२७ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आल्याचे सांगितले.