माजी राज्यमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे सातत्याने होत आहेत. पोलिसांच्या तपासात आणि चौकशीत अनेक गुपितं उघड होत आहेत. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग जवळपास निश्चित झाला असल्याचं म्हटलं जात आहे. आरोपींनी चौकशीदरम्यान गुन्हे शाखेला सांगितलं की, ते पंजाबमधीलतुरुंगात होते, तेव्हा त्यांची बिश्नोई गँगमधील सदस्याशी ओळख झाली.
अडीच लाख रुपयांची सुपारी
या चार आरोपींपैकी तीन आरोपी हे पंजाबमधीलतुरुंगात होते. तिथे आधीपासून तुरुंगात असलेल्या बिश्नोई टोळीच्या सदस्याशी शूटर्सची ओळख झाली. त्यामुळे त्यानंतर तिन्ही आरोपी हे देखील लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये सामील झाले. यानंतर आरोपींनी बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी अडीच लाख रुपयांची सुपारी घेतली.
शूटर्सनी कुर्ला परिसरात भाड्याने घेतलं घर
हत्येनंतर शूटर प्रत्येकी ५०-५० हजार रुपये वाटून घेणार होते. मात्र मुंबई पोलिसांनी त्यांना त्याआधीच पकडलं. चौकशीदरम्यान शूटर्सनी असंही सांगितलं की, एक महिन्यापूर्वी (२ सप्टेंबर रोजी) शूटर्सनी मुंबईतील कुर्ला परिसरात भाड्याने घर घेतलं होते. त्यासाठी दरमहा १४ हजार रुपये भाडं दिलं जात होतं.
क्राइम ब्रँचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपीही अशाच पद्धतीने भाड्याच्या घरात राहून रेकी करत असे आणि त्यानंतर गोळीबाराची घटना घडवून आणली. आता या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी गुन्हे शाखेची वेगवेगळी पथकं उज्जैन (मध्य प्रदेश), दिल्ली आणि हरियाणा येथे रवाना झाली आहेत. एबीपी न्यूजने याबाबतचे वृत्त दिले आहे.