अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. मुंबई पोलिसांना आरोपीच्या फोनमध्ये सिद्दिकी यांच्या मुलाचा फोटो सापडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मास्टरमाईंडने झिशान सिद्दिकी यांचा फोटो शूटर्ससोबत स्नॅपचॅटद्वारे शेअर केला होता. शूटर्स आणि हत्येचा कट रचणाऱ्यांनी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी या एप्लिकेशनचा वापर केला होता.
दसऱ्यानिमित्त फटाके फोडत असतानाच झिशान यांच्या ऑफिसबाहेर बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. तीन शूटर्सपैकी गुरमेल सिंह आणि धर्मराज कश्यप यांना तेव्हाच ताब्यात घेण्यात आलं होतं. याप्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
रिपोर्टनुसार, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या शुटर्सनी मुंबईतील कुर्ला परिसरात भाड्याच्या घरात राहून युट्यूबवरील व्हिडीओ पाहून पिस्तूल चालवायला शिकले. आरोपींनी सुमारे चार आठवडे असे व्हिडीओ पाहिले. त्यांनी पोलिसांपासून वाचण्यासाठी इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटद्वारे संवाद साधला. या दोन्ही एप्समध्ये एक फीचर आहे जे मेसेज पाहिल्यानंतर किंवा एका वेळेनंतर आपोआप डिलीट होतात.
या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. याच गँगमधील एका व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट केली की, बाबा सिद्दिकी यांना टार्गेट करण्यात आलं कारण त्यांचे बॉलिवूड अभिनेता सलमान खानशी जवळचे संबंध होते. सलमान खानला गेल्या काही वर्षांपासून लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सतत धमक्या येत आहेत.