मुंबई : माजी मंत्री झियाउद्दीन अब्दुल रहीम सिद्दिकी उर्फ बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या गुरमेल बलजित सिंग (२३) आणि अन्य एका आरोपीला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एका आरोपीने आपले वय १७ सांगितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केलेल्या आधारकार्डनुसार त्याचे वय २१ होते. वयाच्या मुद्द्यावरून एक ते दीड तास गोंधळ उडाल्यानंतर न्यायालयाने आरोपीची वैद्यकीय चाचणी करून कोठडीसाठी पुन्हा न्यायालयात सादर करण्यास सांगितले. तर, गुरमेल याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दोन्ही आरोपींची वैद्यकीय चाचणी करून दुपारी ३च्या सुमारास त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी आरोपींना वय विचारताच एकाने “मै १७ साल का हुँ” असे सांगताच सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. गुन्हे शाखेने सादर केलेल्या माहितीनुसार, आरोपीचे वय १९ होते. सरकारी वकील गौतम गायकवाड यांनी न्यायालयात दिलेल्या माहितीत, आरोपीकडील आधारकार्डनुसार त्याचा जन्म २००३चा असल्याने त्याचे वय २१ असल्याचे सांगितले. न्यायाधीशांनी त्याचे आधारकार्ड मागवून घेतले. आधारकार्डबाबत विचारताच त्याने ते बनावट असल्याचे सांगितल्याने गोंधळात भर पडली. आरोपींचे वकील सिद्धार्थ अग्रवाल यांनी याबाबत चौकशीची मागणी केली. काही वेळाने आरोपीने आधारकार्डवरील नावही खोटे असल्याचे न्यायालयात सांगितले. जवळपास एक ते दीड तास वयावरच युक्तिवाद सुरू होता.
सरकारी वकील गायकवाड यांनी वयाचा मुद्दा बाजूला सारून दोघांच्या १४ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. आरोपी वेगवेगळी नावे सांगत आहे. राजकीय क्षेत्रातील एका मोठ्या व्यक्तीची अंगरक्षक असतानाही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आरोपी उत्तर प्रदेश, हरयाणाचे आहेत. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून देशाबाहेर कनेक्शन आहे. आरोपींकडून २८ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्या रडारवर आणखीन किती जण होते? मास्टरमाईंड कोण? याचा तपास करणे बाकी असल्याने पोलिस कोठडी आवश्यक आहे, असे ॲड. गायकवाड यांनी न्यायालयास सांगितले.