बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पैशांची महत्त्वाची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सलमान वोहराच्या नावाने गुजरातमधील कर्नाटक बँकेच्या आनंद शाखेत बँक खातं उघडण्यात आलं होतं. ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँग आणि शुभम लोणकर यांनी अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब करून पैसे जमा केले.
बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी कॅश डिपॉझिट मशीनचा वापर करून विविध ठिकाणांहून खात्यात पैसे जमा करण्यात आले. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील विविध राज्यांमधून वोहराच्या खात्यात ६ लाख रुपये जमा करण्यात आले. लॉरेन्स गँग आणि शुभम लोणकर यांनी अवलंबलेली रणनीती इतकी काटेकोरपणे आखण्यात आली होती की, गुन्हे शाखेला त्या सर्वांची ओळख अद्याप पटलेली नाही, ज्यांनी शुभमच्या सूचनेनुसार अनेक ठिकाणांहून पैसे जमा केले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम लोणकरने फंड ट्रान्सफरचा प्लॅन आखला होता, मात्र अनमोल बिश्नोईने या ऑपरेशनमध्ये मदत केली होती. अनेक राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या स्लीपर सेलने वोहरा याच्या खात्यात पैसे जमा केले. याच गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आणखी एक आरोपी सुमित वाघ याने विविध ठिकाणांहून पैसे जमा केल्याचं गुन्हे शाखेच्या चौकशीत स्पष्ट झाले.
शुभमच्या सांगण्यावरूनच पैसे ट्रान्सफर केल्याचंही त्याने सांगितलं. दसऱ्याच्या दिवशी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुलगा झिशान यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी विविध राज्यातून अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. अभिनेता सलमान खानच्या जवळचे असल्याने बाबा सिद्दिकी यांची लॉरेन्स बिश्नोई गँगने हत्या केल्याचं म्हटलं जात आहे.