बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याच दरम्यान आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हत्येच्या 'मास्टरमाईंड'ने एका 'शूटर'ला बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट देण्याचं आश्वासन दिलं होतं, जेणेकरून तो परदेशात पळून जाऊ शकेल. पोलिसांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. शूटर गुरनाल सिंह याला ५० हजार रुपयेही दिले, असं एका पोलीस अधिकाऱ्याने एजन्सीला सांगितलं.
१२ ऑक्टोबर रोजी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुलगा झिशान यांच्या वांद्रे येथील कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गुरनाल आणि धर्मराज कश्यप यांना हल्ल्यानंतर लगेचच पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. शिवकुमार गौतम त्यावेळी पळून जाण्यात यशस्वी झाला. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये हरियाणातील कैथल येथील रहिवासी गुरनाल सिंह याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासानुसार, गुरनालला या प्रकरणाची खूप भीती होती आणि म्हणूनच त्याला देश सोडून पळून जायचं होतं. अधिकाऱ्याने सांगितलं की, हत्येच्या मास्टरमाईंडने त्याला बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवून भारत सोडण्यास मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. याप्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी हत्याकांडातील आरोपी अमित हिसामसिंह कुमार याला बुधवारी गुन्हे शाखेने अटक केली. २९ वर्षीय अमित हरियाणातील कैथल येथील रहिवासी आहे.
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींनी जंगलात केला गोळीबाराचा सराव, कारण...
बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात पोलीस सातत्याने नवनवीन खुलासे करत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत आता आणखी एक मोठी बाब समोर आली आहे. चौकशीदरम्यान पोलिसांना माहिती मिळाली आहे की, बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्याआधी शूटर्सनी कर्जत खोपोली रोडवरील जंगलात पिस्तुलाने गोळीबार करण्याचा सराव केला होता.