लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेचा सदस्य असलेल्या एका ३० वर्षीय दहशतवाद्याला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पंजाबमधील भटिंडा कारागृहातून ताब्यात घेत अटक केली आहे. दिलप्रीतसिंग ओमकारसिंग डहाण असे या दहशतवाद्याचेे नाव आहे. २०१६ मध्ये नांदेडमध्ये घडलेल्या हत्याकांडप्रकरणी एटीएसने ही कारवाई केली आहे.
दहशतवादी हरविंदरसिंग उर्फ रिंधा याने साथीदाराच्या मदतीने ऑगस्ट २०१६ मध्ये नांदेडमधील सकोजीनगरमध्ये राहणाऱ्या अवतार सिंग उर्फ मन्नू याच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती. रिंधा याचा विरोधक असलेल्या रोशन माळी याला मदत करत असल्याच्या संशयातून मन्नू याची हत्या करण्यात आली होती. आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या एटीएसच्या पथकावरही या आरोपीने गोळीबार केला होता. याप्रकरणी नांदेडमधील वजिराबाद पोलीस ठाण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न आदींन्वये गुन्हे नोंदवण्यात आले.
कोण आहे रिंधा? मूळचा पंजाबच्या तरणतारण जिल्ह्यातील असलेल्या रिंधाचा जन्म नांदेडमध्ये झाला. नांदेड पोलिसांकडून कारवाईच्या भीतीने रिंधा पंजाबमध्ये पळून गेला. नांदेडमध्ये रिंधावर १४ तर पंजाबमध्ये २३ गुन्हे दाखल आहेत. खंडणी, हत्या, धमकी यांसारखे गुन्हे रिंदावर आहेत.
एटीएसने केलेल्या तपासात नांदेडमधील शहीदपूरचा रहिवासी असलेला रिंधा हा बब्बर खालसा दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती पुढे येताच, पुढील तपासासाठी गुन्हा मे २०२२ मध्ये एटीएसकडे वर्ग करण्यात आला. रिंधासोबतच त्याचा साथीदार डहाण याचा गुन्ह्यातील सहभाग समोर आला आहे. डहाण हा पंजाबमधील नूरपुबेदी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका हत्येच्या गुन्ह्यात भटिंडा येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. एटीएसने डहाण याला कारागृहातून ताब्यात घेत अटक केली.