लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ' साहेब माझं बाळ गायब झाल्याचे सांगत आईने पोलीस ठाण्यातच हंबरडा फोडला. पोलिसांनी तात्काळ वेगवेगळी पथके तयार करत आरोपीचा शोध सुरू केला. अवघ्या २४ तासांच्या आत बाळाची सुटका करत पुन्हा आईच्या कुशीत दिले. आणि पोलिसांनी अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली.
झेव्हियर कॉलेजसमोरील सार्वजनिक शौचालयाजवळ फूटपाथवर राहणारे कुटुंब. २६ ऑक्टोबर रोजी अडीच महिन्यांची मुलगी बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन गाठले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला. याप्रकरणी ८ पथके तयार करून स्थानिक, रेल्वे आणि खबऱ्यांच्या मदतीने तपास सुरू केला. डोंगरी पथकाने प्रथम घटनास्थळ गाठून मुलीला शोधून काढत आरोपीला ताब्यात घेतले.
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सांगितले की, टीमने कठोर परिश्रम करून दिवाळीच्या मुहूर्तावर सण बाजूला ठेवून बाळाला शोधून काढले. आणि बाळ पुन्हा आईच्या कुशीत दिले. यामध्ये रेल्वे पोलिसांचे मोठे सहकार्य मिळाले. मोहम्मद हनिफ असे आरोपीचे नाव आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी बाबत अधिक माहिती घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्राथमिक तपासात बाळ विक्रीसाठी त्याने अपहरण केल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.