यवतमाळ : बचत गटाच्या महिलांना ११०० रुपये भरल्यास ४० हजारांचे कर्ज मिळते. सोबतच आरोग्याचा विमाही काढला जातो, अशी बतावणी करून महिलांची फसवणूक करणारा आरोपी दोन वर्षांपासून पसार होता. त्याला अवधूतवाडी पोलिसांनीयवतमाळात मंगळवारी रात्री १० वाजता अटक केली. या आरोपीने अमरावती व जळगाव या दोन जिल्ह्यांमध्ये अनेकांना गंडविल्याच्या तक्रारी आहेत.
ज्ञानेश्वर उर्फ गुंडा गोटीराम जोशी (२८) रा. वाकोड ता. जामनेर जि. जळगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो यवतमाळातील डेहणकर ले-आऊटमध्ये देविदास गदई यांच्याकडे आश्रयाला होता. मोस्ट वॉन्टेड आरोपी यवतमाळात दडून असल्याची माहिती सायबर सेलकडून मिळाली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक दर्शन दिकोंडवार, समाधान कांबळे, प्रदीप कुरडकर, प्रकाश चरडे यांनी सापळा रचून शिताफीने रात्री त्याला अटक केली. या आरोपीकडून नऊ एटीएम कार्ड, पाच सीमकार्ड, एक कार जप्त करण्यात आली. गुंडा याच्यावर धारणी पोलीस ठाण्यावर बचत गटांच्या महिलांची फसवणूक केल्याचे तीन गुन्हे दाखल आहे. यापूर्वी त्याने जळगाव जिल्ह्यातही बचत गटांच्या महिलांना अशाच पद्धतीने गंडा घातला आहे. जळगाव पोलीस दोन वर्षापासून गुंडाच्या मागावर होते. अवधूतवाडी पोलिसांनी अटकेची कारवाई करून गुंडाला धारणी पोलिसांच्या स्वाधीन केले.धारणीत ३३ महिलांची आर्थिक फसवणूकधारणी येथे बचत गटाच्या ३३ महिलांकडून गुंडाने इन्शूरन्स काढण्याच्या नावाने प्रत्येकी ११०० रुपये गोळा केले. या मोबदल्यात सुमित्रा फायनान्स कंपनीकडून प्रत्येक महिलेला हेल्थ कार्ड दिले जाईल, तीन दिवसात प्रत्येक महिलेला ४० हजार रुपये मिळेल, अशी बतावणी केली. यावेळी गुंडा जोशीसोबत गोपाल युवराज भवर व इतर दोन साथीदार होते, असे तक्रारदार प्रमिला महेंद्र कास्देकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे.