मडगाव - काणकोणात तीन दिवसांपूर्वी एका दुकानावर धाड टाकून 16 लाखांची दारु पकडण्याची घटना ताजी असतानाच शनिवारी सकाळी पोळेहून मडगावला बेकायदेशीररित्या दारु घेऊन येणारे आणखी एक पिकअप जप्त करुन सुमार चार लाखांची दारु काणकोण पोलिसांनी पकडली.
या प्रकरणात महमद सलीम शेख या वाहन चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 2357 लिटर दारु जप्त करुन ती अबकारी खात्याच्या स्वाधीन केल्याची माहिती काणकोणचे पोलीस निरीक्षक सुदेश नार्वेकर यांनी दिली. आतापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात मागच्या 11 दिवसात तब्बल 2.80 लाखांची दारु पकडली आहे.
केपेचे पोलीस उपअधीक्षक किरण पोडुवाल यांना त्यांच्या खबऱ्यांकडून पोळेहून एक पीकअप बेकायदेशीर दारु घेऊन मडगावच्या दिशेने येणार असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी काणकोण पोलिसांना सतर्क केले. काणकोण पोलिसांनी त्यानंतर नाकाबंदी लावली असता सकाळी 7.15 च्या दरम्यान एका पीकअपमध्ये दारु घेऊन जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या दारु संदर्भातील कागदपत्रे मागितली असता, चालक ती देऊ शकला नाही. सदर दारु हलक्या प्रकारची विस्की होती आणि बहुतेक ती ज्या ठिकाणी देशी पर्यटकांची जास्त गर्दी असते त्या ठिकाणच्या बारवर विकण्यासाठी नेली जात असावी असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या मोहिमेत निरीक्षक सुदेश नार्वेकर यांच्यासह उपनिरीक्षक रमेश शिरोडकर व गस्ती पथकाच्या इतर पोलिसांचा समावेश होता.