नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या बदायूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 15 ऑगस्ट रोजी देशभक्तीपर कार्यक्रमासाठी सराव करणाऱ्या मुलाचा तालमीदरम्यान मृत्यू झाला आहे. 10 वर्षांचा मुलगा देशभक्तीपर कार्यक्रमात शहीद भगतसिंग यांची भूमिका साकारणार होता. यासाठी तो तालीम करत होता. मात्र तालमीदरम्यान फाशीचा फास अचानक त्याच्या गळ्याभोवती घट्ट बसला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, 10 वर्षीय शिवम भगतसिंग यांची भूमिका करत होता.
शिवम फाशीच्या भागाची तालीम करण्यासाठी स्टूलवर चढला होता. त्याने गळ्याभोवती फास घातल्याबरोबर अचानक खाली ठेवलेल्या स्टूलवरून तो घसरला. ज्यामुळे त्याच्या गळ्याभोवती फास घट्ट झाला. त्यावेळी तिथे असलेली मुले त्याला मदत करू शकली नाहीत. दरम्यान या घटनेत शिवमचा मृत्यू झाला. तर, मुलाच्या कुटुंबीयांकडून ही घटना अपघात असल्याचे सांगत त्यांनी कोणाविरोधात तक्रार केलेली नाही. शिवमच्या कुटुंबाने कोणतीही कायदेशीर कारवाई न करता मुलावर अंत्यसंस्कार केले.
परिसरात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे, शिवमच्या कुटुंबीयांनी अपघातामुळे ही घटना घडल्याने कोणालाही दोष देता येत नाही असं म्हटलं आहे. गुरुवारी दुपारी 10 वर्षीय शिवम काही मुलांसोबत खेळत होता. त्याच्यासोबत गावातील प्राथमिक शाळेतील मुलेदेखील होती. या सर्व मुलांनी 15 ऑगस्टसाठी नाटकाचा सराव सुरू केला. शिवमने यामध्ये भगतसिंग यांची भूमिका साकरली होती. शिवमने खाटेवर चढून फाशीचा दोर वर बांधला. त्याने मुलांना सांगितले की मी भगतसिंग यांच्यासारखा फासावर लटकेल.
शिवमने गळ्यात दोर घालताच अचानक त्याच्या पायाखालून स्टूल सरकला आणि त्याच्या गळ्याभोवती फास बसला ज्यामुळे त्याचा जीव गुदमरला. तिथल्या मुलांना त्यावेळी काहीच समजले नाही. शिवम पाहून तिथे असलेल्या मुलांनी जोरजोरात आवाज केला आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले यानंतर शिवमच्या पालकांना तेथे बोलावून संपूर्ण प्रकरण सांगण्यात आला. यामध्ये शिवमचा मृत्यू झाला असून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.