नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात 50 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला व तिची हत्या करण्यात आली. तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घुसविण्यात आली. याप्रकरणी एका पुजाऱ्यासह तिघांवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखी देवी यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी गुरुवारी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. महिलेने कोणाच्याही प्रभावाखाली एकटं बाहेर पडायला नको होतं. पीडित महिला संध्याकाळी एकटीच बाहेर गेली नसती तर अशी घटना घडली नसती असं चंद्रमुखी यांनी म्हटलं आहे.
चंद्रमुखी देवी यांच्या या वादग्रस्त विधानवरून अनेकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. जोरदार टीका केली आहे. मात्र टीकेचा सामना करावा लागल्यानंतर त्यांनी आपलं विधान मागे घेतले आहे. तसेच विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखी देवी यांनी बदायूंमध्ये जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबीयांची भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी चंद्रमुखी यांनी महिलांनी कोणत्याही वेळी घराबाहेर पडू नये. पीडिता संध्याकाळच्या वेळी एकटी बाहेर गेली नसती तर ही घटना घडली नसती असं म्हटलं.
महिलेला फोन करून बोलावण्यात आलं होतं. यामुळे हे प्रकरण सुनियोजित होतं. फोन आल्यावर पीडित महिला तिथे गेली आणि अशी परिस्थिती उद्भवली असं देखील चंद्रमुखी देवी म्हणाल्या. मात्र त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. बदायूं सामूहिक बलात्कार प्रकरणी विविध वृत्तवाहिन्यांमधून आपलं विधान दाखवण्यात येत आहे. महिलांनी संध्याकाळी घराबाहेर पडू नये असं दाखवलं जात आहे. मात्र आपण या संदर्भात काहीही बोललो नाही. आपल्या विधानाचा कुठूनही अर्थ निघत असेल तर ते मी मागे घेते आणि पीडित कुटुंब आणि महिलांची माफी मागते, असं चंद्रमुखी यांनी म्हटलं आहे.
बदायूं बलात्कार प्रकरणावरून काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार टीका केली आहे. उत्तरप्रदेशातील हाथरस येथे गेल्या 14 सप्टेंबर रोजी 19 वर्षे वयाच्या दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. बलात्कार पीडितेच्या गुप्तांगात व पायांना जखमा झाल्याचे व मारहाणीत बरगड्या मोडल्याचे उत्तरीय तपासणीत आढळून आले. ही महिला देवळात दर्शनाला गेली होती. त्यानंतर ती मृतावस्थेत आढळली. या गुन्ह्यातील आरोपी असलेला पुजारी सध्या फरार असून, त्याचा कसून शोध सुरू आहे.
महिला सुरक्षिततेकडे दुर्लक्ष - प्रियंका गांधी
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सांगितले की, उत्तरप्रदेशमधील महिलांच्या सुरक्षिततेबाबत त्या राज्यातील प्रशासनाचा दृष्टिकोन चांगला नाही. हाथरसच्या बलात्कार प्रकरणात राज्य सरकारच्या प्रशासनाने पीडितेच्या म्हणण्याकडे दुर्लक्षच केले. बदायूंत जिथे बलात्कार झाला त्या ठिकाणाची पोलिसांनी तपासणीही केली नाही.
"मुली स्वतःहून संबंध ठेवतात अन् ब्रेकअपनंतर बलात्काराच्या तक्रारी करतात"
देशात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटना या सातत्याने समोर येत आहेत. याच दरम्यान छत्तीसगड राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त विधान केलं होतं. "बहुतांश मुली या आधी स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर पुरुषांवर बलात्कार केल्याचा आरोप करतात" असं विधान महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केलं होतं. "जर एखादी विवाहित व्यक्ती एखाद्या मुलीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवत असेल तर अशावेळी मुलींनी हे बघायला हवं की ती व्यक्ती त्यांना जगण्यासाठी मदत करणार आहे की नाही. मात्र जेव्हा त्यांचे असे हे संबंध तुटतात तेव्हा बहुतांश घटनांमध्ये महिला पोलीस ठाण्यात धाव घेतात" असं नायक यांनी म्हटलं होतं.