Badlapur Case, Akshay Shinde: ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये लहानग्या शाळकरी मुलींच्या लैंगिक छळाच्या प्रकरणावरून राज्यात संताप व्यक्त होत आहे. आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दुसरीकडे आरोपीच्या पालकांनी आपल्या मुलाला या प्रकरणात नाहक गोवण्यात आल्याचा दावा केला आहे. याच दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सामान्य नागरिकांच्या उद्रेकानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी करण्यासाठी SIT स्थापनेचे आदेश दिले होते. त्या टीमने तपास करत आरोपी अक्षय शिंदेच्या घरात तपासणी केली. यावेळी मोबाईलसह काही पुरावे मिळाल्याची माहिती समोर आली. अक्षयचा मोबाईलही ट्रेस करण्यात आला असून, त्यातून अनेक खुलासे होत आहेत. पुढील तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे. त्याच मुद्द्यांवर अक्षय शिंदेला कोठडी सुनावण्यात आली आहे.
पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल करू नये, याकरता शाळा प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी त्यांच्या कुटुंबाचा मानसिक छळ केल्याचा ठपका शासनाने या प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या दोन सदस्यीय समितीने ठेवला असल्याचे समजते. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी अत्याचाराची माहिती सर्वप्रथम शाळा प्रशासनाला दिली होती. मात्र शाळेच्या मुख्याध्यापिकेने हा प्रकार शाळेत घडलाच नाही, कुठेतरी बाहेर घडला असावा असा दावा केला. मुलीच्या गुप्तांगाला झालेली जखम ही सायकल चालवल्यामुळेही होऊ शकते, असे म्हणत मुख्याध्यापिकेने ही घटना दडपण्याचा प्रयत्न केला. या मागील कारणाचा शोध चौकशीअंती लागेल, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, दोन शालेय मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याने मंगळवारपासून बंद ठेवण्यात आलेली बदलापूरमधील ती खासगी शाळा प्रशासक नेमल्यानंतर शनिवारी पुन्हा सुरू करण्यात आली.