लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी फरार असलेल्या दोन आरोपींना अद्याप ताब्यात न घेण्यात आल्याने उच्च न्यायालयाने विशेष तपास पथकावर (एसआयटी) ताशेरे ओढले. तसेच, गुन्हेगारांच्या हितापेक्षा मुलांच्या हिताला प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने मंगळवारी शाळेचे अध्यक्ष आणि सचिवांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली.
आरोपींना शोधण्यासाठी पोलिस देशातील सर्व राज्यांत तपास करतात. पण, या प्रकरणात तुम्ही शाळेचे अध्यक्ष आणि सचिवांचा शोध लावू शकला नाहीत? तुम्ही आरोपींना अटकपूर्व जामीनाची वाट पाहात आहात का, असा प्रश्न न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ यांना केला.
खंडपीठाने विचारलेल्या या प्रश्नावर सराफ यांनी आक्षेप घेतला. हे अयोग्य आहे, असे सराफ यांनी म्हटले. त्यावर, दोन आरोपी फरारी आहेत, हे सांगितल्यावरच तुम्हाला असे प्रश्न विचारले जाणे अपेक्षित आहे, असे न्यायालयाने त्यांना म्हटले. आम्ही कोणालाही त्यांच्या राजकीय भाषणात आमचा वापर करू देणार नाही. आम्ही येथे फक्त न्याय देण्यासाठी आहोत, असेही न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी सुनावले. एसआयटीने मुख्याध्यापक, शाळेचे अध्यक्ष व सचिवांवर आरोपपत्र दाखल केले आहे, अशी माहिती सराफ यांनी दिली. पुढील सुनावणी २३ ऑक्टोबर रोजी होईल.
फरारी आरोपी आणि अक्षय शिंदेमध्ये भेदभावशाळेमधील सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यात आले आहे. तरीही शाळेवर पुरावे नष्ट केल्यासंदर्भात कारवाई करण्यात आली नाही. मोठ्या माशांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. फरारी दोन्ही आरोपी आणि अक्षय शिंदे यांच्याबाबत भेदभाव करण्यात येत आहे, असा आरोप अक्षय शिंदेच्या वकिलांनी केला.
मुली अद्यापही शाळेत जात नाहीतबदलापूर प्रकरणातील पीडित मुली अद्यापही शाळेत जाऊ शकत नाहीत. ज्यांच्यावर विश्वास ठेवून तक्रार केली, त्यांनी मदत केली नाही. आता शाळा व्यवस्थापनातील आरोपीही फरारी आहेत. त्यामुळे मुली शाळेत जाऊ शकल्या नाहीत, असा युक्तिवाद मुलींच्या वतीने ॲड. कविश खन्ना यांनी न्यायालयात केला.