लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: २६३ कोटी रुपयांच्या आयकर परतावा घोटाळाप्रकरणी ईडीने आता दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवला आहे. याप्रकरणी गेल्या सोमवारी ईडीने आयपीएस अधिकाऱ्याचा पती पुरुषोत्तम चव्हाण याला अटक केली होती. त्याच्या सांगण्यावरून या पोलिस कर्मचाऱ्यांनी पैशांच्या काही बॅगा आणून चव्हाण याला दिल्याचे त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती आहे.
दोन्ही पोलिस कर्मचारी हे आयपीएस अधिकाऱ्याच्या सेवेत आहेत. चव्हाण याच्या अटकेनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी या पोलिसांची चौकशी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवला.
पोलिसांचा वापर...
२६३ कोटी रुपयांच्या आयकर परतावा घोटाळ्यातील ५५ कोटी ५० लाख रुपये हे मुंबईतील एक व्यावसायिक राजेश बत्रेजा याला मिळाले होते. त्याने हे पैसे दुबईत हवालामार्गे पाठवले होते. तेथून हे पैसे भारतात दोन कंपन्या स्थापन करत त्यामध्ये गुंतवणूक म्हणून दाखवले होते. याप्रकरणी बत्रेजा याला यापूर्वीच ईडीने अटक केली आहे. या प्रकरणात चव्हाण याने बत्रेजा याला मदत केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी झालेल्या आर्थिक व्यवहारातील पैसा आणण्यासाठी चव्हाण याने त्याच्या आयपीएस पत्नीच्या सेवेत असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा वापर केल्याचा आरोप असून, त्यामुळेच या पोलिस कर्मचाऱ्यांचा ईडीने जबाब नोंदवला आहे.